प्रत्येक जिल्ह्यात हेक्टरी २३ क्विंटलप्रमाणे कापूस खरेदी.
प्रत्येक जिल्ह्यात हेक्टरी २३ क्विंटलप्रमाणे कापूस खरेदी.
नागपूर, दि.१२ डिसेंबर :
अद्यावत कृषी तंत्रज्ञान व प्रणालीचा वापर करून राज्यातील अनेक शेतकरी कापसाचे उच्चतम उत्पादन घेतात. त्यानुसार राज्यात किमान हमीभाव योजनेअंतर्गत हेक्टरी कापूस खरेदी मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राज्यात सर्व जिल्ह्यासाठी उच्चतम उत्पादकता नुसार हेक्टरी 23 क्विंटल उत्पादकता निश्चित करून त्याप्रमाणे कापूस खरेदी करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत.
शेतकरी सुधारित सिंचन पद्धती आणि आधुनिक शेती तंत्रांचा वापर करून अधिक उत्पादन घेत आहेत. मात्र, प्रत्यक्षातील जादा उत्पादन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणल्यावर, उत्पादकता मर्यादा कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे ही मर्यादा वाढविण्याची मागणी लोकप्रतिनिधी आणि शेतकरी सातत्याने करत होते. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पणन मंत्री रावल तसेच विविध लोकप्रतिनिधींची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेक्टरी 23 क्विंटल प्रमाणे कापूस खरेदी करण्याचे निर्देश दिले.
पिक कापणी प्रयोगांतील उच्चतम 25% उत्पादन विचारात घेऊन लातूर, वर्धा व गडचिरोली या उच्च उत्पादन असलेल्या तीन जिल्ह्यांची सरासरी 23 क्विंटल आहे त्यानुसार सर्व जिल्ह्यासाठी 23 क्विंटल अशी राज्यभर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही उत्पादकता मर्यादा फक्त खरीप 2025 मध्ये उत्पादित कापूस MSP खरेदीसाठीच लागू राहणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
