IMG-20251208-WA0136

कष्टक-यांचा आधारवड हरपला..

पुणे, दि. ९ डिसेंबर २५ ;

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव यांचे सोमवारी रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्यांनी जगाचा निरोप घेतला.श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ ही त्यांची ओळख होती. त्यांच्यामागे पत्नी शीला आढाव, असीम आणि अंबर ही दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

कष्टक-यांचा आधारवड हरपला…
“सामाजिक न्यायाचे एक मजबूत आधारस्तंभ आणि महान कामगार नेते बाबा आढाव जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य उपेक्षित, शोषित आणि कामगार वर्गाच्या हक्कांसाठी समर्पित केले. पुण्यात पेटवलेल्या त्यांच्या संघर्षाच्या ज्योतीने देशभर सामाजिक न्यायाचा मार्ग खुला झाला”, असे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

डाॅ. बाबा आढाव यांनी वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांचे आधारस्तंभ म्हणून काम केले. हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजुरांना न्याय देण्यासाठी त्यांनी संघटन उभे केले. हमाल पंचायत, एक गाव-एक पाणवठा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. सामाजिक कुप्रथांविरोधात त्यांनी दिलेला लढा हा कायम स्मरणात राहील. महाराष्ट्राला समाजसेवकांची एक थोर परंपरा कायमच लाभली. त्या परंपरेतील एक मौलिक व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले. ते कायम स्मरणात राहतील, त्यांचे विचार येणार्‍या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्पण केली आहे.

श्रमिक-कष्टकऱ्यांसह समाजकारणातील निस्पृहता, तळमळ आणि अत्युच्च प्रामाणिकतेचे प्रतिक असलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. श्रमिक, कष्टकरी, दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अहोरात्र झटणारा महान संघर्षयोद्धा आज हरपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

डॉ. बाबा आढाव यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गेल्या सोमवारीच पूना हॅास्पीटलला जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. डॉ बाबा आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ, सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी होते. असंघटित कामगार, वंचित, कष्टकरी, विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. ‘हमाल पंचायती’च्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले. ‘एक गाव एक पाणवठा’ या क्रांतीकारी चळवळीचे नेतृत्व करत समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या निधनाने कष्टकरी समाजाचा मोठा आधारस्तंभ व मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आढाव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *