मुंबईकरांचा श्वास अत्यंत विषारी व घातक..

0
IMG-20251129-WA0084

मुंबईकरांचा श्वास अत्यंत विषारी व घातक..

मुंबई, दि. १ डिसेंबर २०२५ ..

भाजपा महायुती सरकारने विकासाच्या नावाखाली मुंबईला गॅस चेंबर केले आहे. प्रदुषण प्रचंड वाढले आहे, लहान मुले आजारी पडत आहेत, वृद्धांना श्वास घेणे कठीण झाले आहे. ही सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी नाही तर काय आहे? असा संतप्त सवाल विचारून जो नियमांचे उल्लंघन करेल तो कितीही मोठा असला तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करा व त्याला शिक्षा करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई एकनाथ गायकवाड यांनी केली आहे.

मुंबई काँग्रेसने प्रदुषणाच्या महत्वाच्या प्रश्नावर आज राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, माजी आमदार मधु अण्णा चव्हाण,प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, माजी नगरसेवक मोहसीन हैदर, अखिलेश यादव, हरगून सिंग, विक्रम सिंग आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार दरवर्षी सुमारे ५,१०० मुंबईकरांचा मृत्यू प्रदूषणाने होत आहे. या कुटुंबांनी आपली माणसे गमावली आहेत असे असतानाही भाजपा महायुती सरकार कंत्राटदारांना प्राधान्य देत आहे आणि मुंबईकरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे हे कसले विकासाचे मॉडेल? वायु प्रदुषण हा ज्वलंत प्रश्न असून तो जनजिवानाशी निगडीत आहे.

मुंबईत वायु प्रदुषण प्रचंड वाढले आहे. AQI 150- 200 असून तो अस्वस्थ करणारा आहे. देवनार, वडाळा भागात तर तो ३००-५०० पर्यंत गेलेला आहे, जो अत्यंत धोकायदायक आहे. मुंबईकर जो श्वास घेत आहे तो आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.वायु प्रदुषणाच्या बाबतीत मुंबई दिल्लीच्याही पुढे जाईल की काय, अशी परिस्थिती आहे. मुंबईची ओळख सर्वाधिक प्रदुषित शहर अशी झालेली आहे. दमा, श्वसनाच्या आजारात वाढ झालेली दिसत आहे. ह्रदय विकाराचे प्रमाणही वाढले आहे.

मुंबईकरांचा प्रत्येक श्वास धोकादायक ठरत आहे. मुंबईकरांच्या स्वच्छ हवेसाठी काँग्रेस ‘मुंबई क्लिन एअर ऍक्शन प्लॅन’ घेऊन येणार आहे. प्रदूषणमुक्त मुंबई हा मुंबई काँग्रेसचा जाहीरनामा उद्या जाहीर करण्यात येणार आहे अशी माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली.

महायुती सरकार प्रदुषण नियंत्रणावर काहीच कारवाई करत नसल्याने मुंबई हाय कोर्टाने सरकारला फटकारले हा सरकारच्या नाकर्तेपणाचा दाखला आहे. सरकार मोठ्या बिल्डर व उद्योगपती यांच्यावर मेहरबान आहे. मुंबईतील वायु प्रदुषणावर बीएमसीचे कोणतेही धोरण नाही. झाडांची सरसकट कत्तल केली जात आहे, सुरक्षिततेचे उपाय न करता अनिर्बंध बांधकामे सुरु आहेत, पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत, मोकळ्या जागा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र लाडक्या बिल्डरांना देऊन टाकले आहे असा बेबंदशाही कारभार सुरू आहे असे अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव सचिन सावंत यांनी म्हटले.

या पत्रकार परिषदेवेळी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मास्क लावले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *