पार्थ पवारांची पुन्हा बंडखोर भूमिका..
मुंबई, दि. २ ऑक्टोबर
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलेले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या ट्विटने सगळ्यांचा भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या ट्विटने राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली आहे. मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिक दाखल करणार असल्याची भूमिका पार्थ पवार यांनी घेतली आहे.
मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी बीड तालुक्यातील केतुरा गावातील तरुण विवेक राहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. याच घटनेच्या अनुषंगाने पार्थ पवार यांनी ट्वीट केलं आहे. पार्थ पवार आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, ‘विवेकने आमच्या मनात पेटवलेली संघर्षाची ज्योत संपूर्ण व्यवस्थेला खाक करू शकते. संपूर्ण मराठा तरुणांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. त्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही,’ असे पार्थने म्हटले आहे. न दिली होती.
लाखो असहाय विवेकला न्याय मिळावा म्हणून माझ्या मनातील मराठा आरक्षणाची पेटलेली मशाल पुढे नेण्यास मी तयार आहे, असे सांगतानाच मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचे ऐकून हादरून गेलो. अशा घटना घडण्याआधीच मराठा नेत्यांनी जागे व्हावे आणि आरक्षणासाठी लढायला हवे, असेही पार्थने म्हटले आहे.
पार्थ पवारांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीसाठी डोकदुखी वाढवणारी आहे. पार्थ पवार यांनी याआधीही सुशांतसिंग प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती त्यानंतर राम मंदिर प्रश्नावर जय श्रीराम म्हणत ट्विट केले होते.
