मालेगावची घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक..
मालेगावची घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक..
मुंबई, दि. २१ नोव्हेंबर..
मालेगावमध्ये एका ३ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तीची हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. भाजपाच्या राज्यात महिला व लहान मुलीही सुरक्षित राहिलेल्या नाहीत हे दाखवणारी ही घटना संताप आणणारी आहे. कायद्याचा धाकच राहिला नसल्याने गुन्हेगारी वाढत आहे. देवेंद्र फडणवीस यांना गृहखात्याच्या कारभार झेपत नाही, त्यांनी गृहखात्याचा पदभार सोडावा व राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा. तसेच मालेगाव प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाशी आघाडी करायची किंवा स्वबळावर जायचे याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. जो निर्णय घेतला आहे तो कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी व वरिष्ठ नेत्यांना विचारून घेतलेला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसची अनेक वर्षांपासूनची आघाडी आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही त्यांच्याशी आघाडी करून आम्ही निवडणूका लढवल्या आहेत. रिपाइंचे काही घटकही काँग्रेससोबत येण्यास इच्छुक आहेत. कायदा हातात घेऊन मारहाण करणारे, दडपशाही करणारे यांच्याबरोबर काँग्रेस आघाडी करणार नाही.
एका प्रश्नाला उत्तर देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा आम्हाला आदर आहे, त्यांची काम करण्याची ऊर्जा ही सर्वांना प्रेरणा देणारी आहे. शरद पवार काय बोलले हे माहित नाही पण इतर कोणाबरोबर आघाडी करण्याबाबत आमची चर्चा झालेली नाही आणि जरतर च्या प्रश्नाला उत्तर देण्यात काही अर्थ नाही, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या..
मुंबईकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला आहे. मुंबईत कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. महिला अत्याचाराचे प्रश्न आहेत. भ्रष्टाचाराचे प्रश्न आहे, क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जमिनी लाटल्या जात आहेत. मुंबईकरांचा पैसा कंत्राटदारांच्या खिशात जात आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत, प्रदुषण वाढले आहे. आरोग्य, शिक्षण याचे प्रश्न आहेत, लोकलचे प्रश्न आहेत. मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. सत्ताधारी भाजपा व शिंदेसेना मुंबईकरांच्या प्रश्नावर बोलत नाही, भ्रष्टाचारावर बोलत नाही. ते फक्त महापौर कोणत्या जातीचा वा धर्माचा होणार नाही यावर विधाने करून जात व धर्माच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत. मुंबईकर सुज्ञ आहेत, ते विचार करून मतदान करतील, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
