फुकाचा ताठा आणि नाव उबाठा…
फुकाचा ताठा आणि नाव उबाठा…
जालना, दि. १४ नोव्हेंबर :
बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत, त्यामुळेच लोकसभेत आणि विधानसभेत बहुमत मिळवलं. आज माझ्यामुळेच काहींना शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागतंय. फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत नाही. फुकाचा ताठा आणि नाव उबाठा!” असा झणझणीत टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.
जालना येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात प्रचंड गर्दी उसळली होती. याप्रसंगी भास्करराव आंबेकर आणि शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या जनसागरावरून शिंदे म्हणाले की, हा महापूर पाहून खात्री पटली की जालना महापालिकेवर भगवा फडकणारच. अर्जुनराव खोतकर, भास्कर आंबेकर आणि कार्यकर्ते जर मैदानात उतरले, तर विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेचा कार्यकर्ता पेटला की मागे फिरत नाही, बूथप्रमुख हाच आपला कणा आहे, त्यांच्यात ‘सगळ्यात मजबूत कोण?’ अशी स्पर्धा लागली पाहिजे, असे शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ही बंडखोरी सत्तेसाठी नव्हती, ही होती राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी. राज्य ठप्प झालं होतं, विकास कामं बंद झाली होती, सण-उत्सव थांबले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की “माझी काँग्रेस होऊ देणार नाही”, पण काहींनी शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधलं. त्यामुळे महाराष्ट्रासाठी उठाव करावा लागला. ही बंडखोरी जनतेसाठी होती, सत्तेसाठी नव्हे. शिंदे म्हणाले, “कोणी आम्हाला दगाबाज म्हणो वा आरोप करो आम्ही आरोपांत उत्तर देत नाही, कामातून देतो. आज शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचं पॅकेज दिलं. लोकांच्या खात्यात पैसे गेले. आणि काही लोक अजून फेसबुक लाईव्ह करून ‘सरकार’ चालवतात!”
शिंदे यांनी जालन्यासाठी अनेक विकास कामांची घोषणा केली. जालना-नांदेड समृद्धी महामार्गावरील शेतकऱ्यांना पूर्ण न्याय मिळेल, महात्मा फुले मार्केट, सिडको, पाणीपुरवठा आणि नगरविकास यांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. झोपडपट्टीतील 2.5 लाख नागरिकांना हक्कपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. जालना शहराचा विकास वेगाने होईल, असं त्यांनी आश्वासन दिलं.
सभेच्या शेवटी शिंदे म्हणाले, “मी आज उपमुख्यमंत्री म्हणून नाही, एक कार्यकर्ता म्हणून आलो आहे. तुम्ही प्रत्येकजण एकनाथ शिंदे बनून लोकांमध्ये जा, मग भगवा फडकणारच आणि त्याला कोणी थांबवू शकणार नाही असे निक्षून सांगितले.
