नाशिकमध्ये ५,७५७ कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन 

0
20251113_224124

नाशिकमध्ये ५,७५७ कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन

नाशिक, ता. १३ नोव्हेंबर :

नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून, जगाच्या अध्यात्मिक नकाशावर भारताचे स्थान अधिक दृढ करणारा सोहळा ठरेल. राज्य सरकार नियोजनबद्ध आणि दर्जेदार तयारीसाठी कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये केले.

पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तब्बल ५,७५७ कोटी ८९ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्यासाठी नाशिक शहर सज्ज झाले होते.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला लक्षात घेऊन शासनाने अल्पकालीन आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा आणि साधुसंतांसाठी निवास व्यवस्था यांसह विविध सुविधा उभारण्यात येणार आहेत.

*नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी*

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “नाशिकचा चेहरामोहरा बदलविण्याची मोठी संधी कुंभमेळ्यामुळे मिळाली आहे. या विकासकामांमुळे शहर स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक होईल. रामकुंड व गोदावरी नदी परिसरात स्वच्छता आणि पाणी शुद्धीकरण यावर विशेष भर देण्यात येईल.”

१४०० एकरवर साधूग्राम – भाविकांसाठी सुसज्ज व्यवस्था..

या सिंहस्थ कुंभमेळ्यात १४०० एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. येथे देशभरातून येणाऱ्या साधुसंतांसाठी सर्व सोयीसुविधांसह निवास व्यवस्था केली जाईल.

शिंदे यांनी सांगितले की, “हा त्रिखंडी कुंभमेळा २२ महिन्यांचा असेल. लाखो भाविक व साधुसंतांच्या व्यवस्थेसाठी प्रशासनाने योजनेसह तयारी करणे आवश्यक आहे. प्रयागराज कुंभमेळ्यातील अनुभवाचा उपयोग आपण करणार आहोत.” असे शिंदे आणि स्पष्ट केले.

*डिजिटल कुंभ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवस्थापन*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या प्रचारासाठी ‘डिजिटल कुंभ’ ही नवी संकल्पना जाहीर केली आहे. याअंतर्गत सर्व माहिती डिजिटल माध्यमांद्वारे भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येईल.

गर्दी नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्थेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केला जाणार आहे. “तंत्रज्ञानाच्या मदतीने अफवा आणि चुकीची माहिती थांबवून माहितीचे योग्य प्रसारण होईल,” असे शिंदे यांनी सांगितले.

*विकासाची ‘गंगा’ अवतरली*

“आज गोदाकाठी विकासाची गंगा अवतरली आहे. नाशिकसाठी ही केवळ धार्मिक पर्वणी नाही, तर विकासाचा महोत्सव आहे,” असे शिंदे म्हणाले.

एकूण ५,७५७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांमध्ये रस्ते, पूल, जलनिस्सारण, स्मार्ट सिटी प्रकल्प, वाहतूक सुधारणा, स्वच्छता योजना आणि नदी पुनरुज्जीवन यांचा समावेश आहे.

*टीमवर्क आणि जनसहभागावर भर*

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, “कुंभमेळा हा महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. प्रत्येक विभागाने, प्रत्येक अधिकाऱ्याने हे काम आपले घरचे समजून करावे. हे एक टीमवर्क आहे आणि सर्वांनी समन्वयाने काम केल्यास हा कुंभमेळा देशभरात आदर्श ठरेल.”

*अध्यात्म आणि विकासाचा संगम*

“सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ अध्यात्माचा उत्सव नाही, तर विकासाचा महाकुंभ आहे. प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने नाशिकचा हा सोहळा उत्कृष्ट आणि निर्विघ्नपणे पार पडेल, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, मंगेश चव्हाण, दिलीप बोरसे, राहुल ढिकले, तसेच वरिष्ठ अधिकारी शेखर सिंह, मनीषा खत्री, आयुष प्रसाद, दत्तात्रय कराळे, संदीप कर्णिक, भास्कर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *