आजच्या एकजुटीने संयुक्त महाराष्ट्र चळवळ आठवली..

0
IMG-20251101-WA0201

आजच्या एकजुटीने संयुक्त महाराष्ट्र चळवळ आठवली..

मुंबई, १ नोव्हेंबर :

लोकशाही संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ आली असून, राजकीय मतभेद विसरून आपल्याला एक व्हावे लागेल असे आवाहन करत निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर केला जात आहे. आजच्या एक जुटीने संयुक्त महाराष्ट्र चळवळ आठवली असे राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोर्चाला संबोधित करताना म्हटले आहे.

मतदार याद्यांमधील घोळ, मतचोरी आणि दुबार नावे या गंभीर मुद्द्यांवरून उसळलेल्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर सत्याचा मोर्चा निघाला. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हे आंदोलन छेडले. हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत रॅली काढली.

मतदार नोंदणी प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेविरोधात आणि पारदर्शक निवडणुकीच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना आदरणीय शरद पवार साहेब बोलत होते.

या मोर्चाला शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे , मनसे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, पक्षाची ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार निलेश लंके उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही सर्व बंधू-भगिनी, तुमचा हा संघर्ष मला इतिहासाची आठवण करून देतो. आजचा मोर्चा मला १९७८-८९ च्या काळात घेऊन जातो. त्या काळात मी महाविद्यालयात शिकत होतो. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी काळा घोडा परिसरात अशाच प्रकारचे मोर्चे निघाले होते. त्या मोर्चामधून विचारांची एकजूट आणि जनतेचा निर्धार दिसून येत होता. आज तुम्ही दाखवलेली एकजूट मला त्या काळाची आठवण करून देते. असे पवार म्हणाले.

आजचा मोर्चा हा कोणत्याही पक्षासाठी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न नसून लोकशाही रचनेच्या रक्षणासाठीचा सामूहिक आवाज आहे. आपण स्वतःसाठी काही मागत नाही, सत्ता किंवा पदासाठीही नाही. आपण फक्त एवढंच म्हणतोय की संविधानाने दिलेले मतदानाचे अधिकार सुरक्षित राहिले पाहिजेत. संविधानात सांगितलेले नियम सत्ताधाऱ्यांच्या मनाप्रमाणे वाकवले गेले तर लोकशाहीचं भविष्य धोक्यात येईल. त्यामुळे, जनतेने सावध राहून निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी दबाव निर्माण करण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी सांगितले

आजचा मोर्चा केवळ पक्षीय आंदोलन नसून, देशाच्या लोकशाही रचनेच्या रक्षणासाठीची सामूहिक हाक आहे. आपण स्वतःसाठी काही मागत नाही, सत्ता किंवा पदासाठीही नाही. आपण फक्त एवढंच म्हणतोय की, लोकशाहीत संविधानाने दिलेले अधिकार जपले गेले पाहिजेत, असा ठाम संदेश शरद पवार यांनी दिला आहे.

संविधानात सांगितलेली प्रत्येक गोष्ट पाळली गेली पाहिजे. पण जर सत्ताधारी मनाप्रमाणे नियम वाकवू लागले, तर लोकशाहीला धोका निर्माण होईल. त्या धोक्याला तोंड देण्यासाठीच आज आपण सगळे एकत्र आलो आहोत. ही लढाई कुणा एका पक्षाची नाही, ही लढाई संविधान आणि लोकशाही वाचवण्याची आहे, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा सल्ला आदरणीय शरद पवार साहेब यांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *