आधी फटकवा नंतर पोलिसांच्या ताब्यात द्या..
आधी फटकवा नंतर पोलिसांच्या ताब्यात द्या..
मुंबई, दि. १ नोव्हेंबर २०२५ :
गेली पाच वर्षे निवडणूक घेतलेली नसताना मतदार यादी दुरुस्तीसाठी अजून काही दिवस गेले तर असं काय नुकसान होणार आहे? पण जी माणसं मतदार यादीत घुसवली आहेत त्यांचं काय? मतदार यादीतील अशा प्रकारचे घोळ ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ही गोष्ट शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचली आहे. जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा दुबार तिबार मतदान करायला आलेल्या लोकांना फटकवा मग पोलिसांच्या हवाली करा असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

सत्याच्या मोर्चात बोलताना राज ठाकरे यांनी भाजपा व निवडणूक आयोगावर तुफान हल्ला केला . ते म्हणाले, निवडणुका या पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात आणि मतदार यादीतील गोंधळ दुरुस्त झालेच पाहिजेत याबद्दल आग्रही असणाऱ्या राजकीय पक्षांनी सत्याचा मोर्चा’ काढला आहे. आजचा मोर्चा हा राग व्यक्त करण्याचा, ताकद दाखवण्याचा, मुद्दा दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा मोर्चा आहे. सत्ताधारी पक्षासह सर्वांना मतदारयादी विषयी तक्रार आहे तर निवडणुकांची घाई कुणासाठी? कल्याण, मुरबाडचे साडेचार हजार मतदार तिकडेही मतदान करतात आणि मलबार हिलमध्येही मतदान करतात. असे महाराष्ट्रात लाखो लोकं असतील. हा फार मोठा विषय नाही, साधी गोष्ट आहे म्हणून मतदारयादी साफ करून पारदर्शक करा आणि त्यानंतरच निवडणूक घ्या.

EVM मध्ये गडबड असल्याचं मी २०१७ पासून सांगतोय. २३० जागा जिंकूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता, कारण विधानसभेला निवडून येणाऱ्यांची सोय आधीच झाली होती. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात १७,२९,४५६ पैकी ६२,३७० दुबार मतदार आहेत. पुणे लोकसभेत १७,१२,२४२ पैकी १,०२,००२ दुबार मतदार आहेत. हीच परिस्थिती राज्यातल्या इतर सर्व मतदारसंघात आहे. त्याचे आज मी पुरावे घेऊन आलो आहे असे सांगून राज ठाकरे यांनी पुराव्याचा भला मोठा गठ्ठा दाखवला…
