जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी मोदींचा मंत्री अडचणीत..

0
images (24)

जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी मोदींचा मंत्री अडचणीत..

पुणे, दि. २३ ऑक्टोबर…

पुण्यातील जैन बोर्डींगच्या जमीन व्यवहारात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत वाढ होत आहे. 3 हजार कोटींची जमीन अवघ्या 300 कोटीत सर्व नियम धाब्यावर बसवून खरेदी केल्याचा आरोप असून जमीन खरेदी करणारा गोखले बिल्डर व मंत्री मोहोळ यांचे निकटचे संबंध असल्याचा आरोप झाल्याने आता हा व्यवहाराला स्थगिती देण्यात आली आहे पण धर्मदाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार काय असा प्रश्न विचारून स्थगिती नाही व्यवहारच रद्द करा अशी मागणी माजी खासदार शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

धंगेकर पुढे म्हणाले की, या प्रकरणात पदाचा गैरवापर करणारे मुरलीधर मोहोळ, जमिनीच्या विक्रीस नियमबाह्य परवानगी देणारे राज्याचे मुख्य धर्मदाय आयुक्त, कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती देत धर्मदाय आयुक्तांची फसवणूक करणारे मेरिट कन्सल्टन्सी व बिल्डर विशाल गोखले यांच्यावर गुन्हे दाखल करावे. पुण्यातील धर्मादाय सहआयुक्तांना या प्रकारची चौकशी करण्याचे आदेश म्हणजे राज्याचे मुख्य धर्मदाय आयुक्त यांनी केवळ स्वतःची फसवणूक झाली आहे, असा दिखावा करण्यासाठी केलेला उद्योग आहे. राज्याच्या मुख्य धर्मदाय आयुक्तांनी या जमीन घोटाळ्यासाठी कुठली शहानिशा न करता नियमबाह्य कामकाज केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

 

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्याशी संबंधित व्यक्ती व संस्था यांना लाभ होईल अशा प्रकारे राज्याच्या मुख्य धर्मदाय आयुक्तांवर दबाव टाकत नियमबाह्यपणे पब्लिक ट्रस्टची प्रॉपर्टी विकण्याची तातडीने परवानगी मिळवून दिली. आपल्या केंद्रीय सहकार राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत राज्यातील दोन बँकांना नियमबाह्य पद्धतीने दोन दिवसात 70 कोटी रुपयांचे कर्ज द्यायला सांगितले. आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करत अवघ्या दोन दिवसांमध्ये कर्ज प्रकरण , तारण व जागेची खरेदी ही सगळी प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने वापरून प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केला.त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे.

 

या जागेबाबतची कागदपत्रे सादर करत असताना नकाशावरील जैन मंदिराचा उल्लेख “ओल्ड स्ट्रक्चर” असा करत धर्मदाय आयुक्त व बँक यांची फसवणूक केल्याबद्दल या मालमत्तेचे व्हॅल्युएशन करणारी संस्था मेरिट कन्सल्टन्सी व बिल्डर गोखले कन्स्ट्रक्शन यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *