‘कृषी यांत्रिकीकरण’साठी 32 लाख लाभार्थ्यांची निवड..
‘कृषी यांत्रिकीकरण’साठी 32 लाख लाभार्थ्यांची निवड
मुंबई , दि. २१ ऑक्टोंबर :
“महाडीबीटी पोर्टलवरील प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार कृषी यांत्रिकीकरण योजने साठी राज्यात 32 लाख लाभार्थ्यांची कृषी विभागातर्फे निवड करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कृषी यांत्रिकीकरण योजनेत लाभार्थ्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेतातील कामे जलदगतीने व वेळेत पुर्ण होण्यासाठी निवड झालेल्या या सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा” असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ता.उत्तर सोलापूर येथे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १०१ विविध कंपन्यांच्या अनुदानित ट्रॅक्टर वितरणाचा कार्यक्रम पार पडला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध कंपन्यांच्या लाभार्थींना ट्रॅक्टरच्या चावीचे हस्तांतरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “सोलापुर जिल्हा हा कृषी क्षेत्रात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. शेतक-यांनी शेती करताना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादनात आणि उत्पन्नात नक्कीच वाढ होईल. सोलापुरातील शेतक-यांचा या योजनेसाठी असलेला प्रतिसाद पाहता त्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे जास्त असल्याचे दिसून येते.”
सोलापूर जिल्ह्यात कृषी विभागामार्फत महाडीबीटी अंतर्गत प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार विविध योजना अंतर्गत 277936 लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. यापैकी कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध योजनांतर्गत ट्रॅक्टर व विविध यंत्र अवजारेसाठी 196251 लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. यापैकी 77773 लाभार्थ्यांची ट्रॅक्टर करता निवड करण्यात आली असून 3533 लाभार्थींना पूर्वसंमती प्रदान करण्यात आली आहे. पूर्वसंमती प्रधान लाभार्थ्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर खरेदी केला असून दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जिल्ह्यात जवळजवळ 1000 ट्रॅक्टरचे वितरण वेगवेगळ्या तालुक्यात करण्यात येणार आहे.
कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत प्रलंबित अर्जाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने व सर्व योजनांमधुन उपलब्ध होणारा निधी मोठ्या प्रमाणात असल्याने सर्व प्रलंबित अर्जांची निवड करण्याच्या सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा बैठकीत कृषी विभागास दिल्या होत्या. त्यामुळे यावर्षी ३२ लाखांहून अधिक लाभार्थ्यांची निवड झाल्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. आजपर्यंतच्या कार्यकाळात एका वर्षात जास्तीत जास्त सात लाख लाभार्थ्यांची निवड झाल्याची नोंद आहे.
राज्यात विक्रमी ३२ लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाल्यामुळे अतिवृष्टीतून सावरण्यासाठी या योजनेचा शेतक-यांना फायदा होणार आहे. कृषी यांत्रिकीकरण योजेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना (DPR Based) कृषी यांत्रिकीकरण या तीन योजना महाडीबीटी पोर्टलवर राज्यात राबविल्या जात आहेत. दि.२२ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषी समृद्धी योजनेला मंजूरी देण्यात आलेली आहे. सदर योजनेंतर्गत देखील कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी निधीची तरतुद करण्यात आलेली आहे.
शेतातील कामे करण्यासाठी मजुरांची कमतरता तसेच शेतीतील कामे जलद गतीने होणेसाठी शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ कृषी यांत्रिकीकरण योजनेतुन मिळावा यासाठी सन २०२५-२६ अंतर्गत वरील तीनही योजनांमधुन महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणा-या लाभार्थ्यांची प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्याने निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पावर टिलर, कंबाईन हार्वेस्टर, मनुष्यचलित यंत्रे, ट्रॅक्टर चलित औजारे, फवारणी यंत्रे, औजारे बँक इ. ची निवड करण्यात आलेली आहे.
