महाराष्ट्राचा तालीबान करायचा आहे का..?

0
IMG-20251007-WA0222

महाराष्ट्राचा तालीबान करायचा आहे का..?

मुंबई, दि. १० ऑक्टोबर;

राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. महिला अत्याचार वाढले आहेत, ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरु आहे. नाशिकला प्रभू रामाच्या वास्तव्याची ओळख आहे, काळाराम मंदिर आहे, अधात्मिक, सांस्कृतीक व ऐतिहासिक ओळख असलेल्या शहरात ड्रग्जचे रॅकेट चालते हे गंभीर आहे. ड्रग्जच्या काळ्याधंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी त्याचे गुजरात कनेक्शन तपासले पाहिजे. एकट्या नाशिक शहरात ९ महिन्यात ४४ खून झाले, हे अत्यंत गंभीर आहे. राज्यातील परिस्थिती पाहता महाराष्ट्राचा तालीबान करायचा आहे का, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

सपकाळ पुढे म्हणाले की, कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असताना राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. गृहराज्य मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालवला जातो, गुंडांना शस्त्र परवाना दिला जातो. अशा या वादग्रस्त गृहराज्य मंत्री योगेश कदम यांची हकालपट्टी केली पाहिजे पण मुख्यमंत्री अशा लोकांना पाठीशी घालतात. रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचे जसे प्रमोशन झाले तसे योगश कदम यांचेही प्रमोशन होऊ शकते, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले.

*सरन्यायाधीशांवरील हल्ला मनुवादी कृत्य..

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टात झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. पण हल्ला करणाऱ्याचे आडनाव जाणीवपूर्वक लपवले जात आहे. अफजल खान भेटीवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करणाऱ्याचे नाव लपवले तसेच या हल्लेखोराचेही आडनाव लपवले जात आहे, हा हल्ला मनुवाद्यांचे कृत आहे. डोंबिवलीतही ७२ वर्षांच्या काँग्रेस कार्यकर्त्याला जातीवाचक शिव्या देऊन अपमानित केले, त्याचे पुढचे पावले सरन्यायाधीशांवरील हल्ला आहे. वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर याचे लोण सर्वत्र पसरेल, अशी भीती काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *