RSS ने आता नथुराम व मनुस्मृती ला तिलांजली द्यावी..
RSS ने आता नथुराम व मनुस्मृती ला तिलांजली द्यावी..
नागपूर, दि. २९ सप्टेंबर २०२५ ;
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, दसरा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्ष हा सुवर्णयोग एकाच दिवशी आलेला आहे. रा. स्व. संघाला १०० वर्षे होत असताना आलेला हा योग संघाने समजून घ्यायला हवा. गांधी पुतळ्याच्या समोर फक्त मानवंदना देऊन चालणारा नाही तर नथुरामचा धिक्कार करून बुरसटलेले विचार, मनुस्मृती व बंच ऑफ थॉट ला तिलांजली देऊन गांधी विचार व भारताचे संविधान स्विकारावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देश एकवटा होता. राजकीय व्यवस्था परिवर्तनाबरोबच सामाजिक परिवर्तन ही काँग्रेसची भूमिका होती तर मुठभर लोकांच्या हातात सत्ता असावी ही संघाची भूमिका होती. छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणाना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काळाराम मंदिरात प्रवेश नाकारणारा, स्त्री-पुरुष समानता न माननारा, स्पृश्य-अस्पृशता माननारा संघाचा विचार आहे तर परिवर्तनाचा व माणुसकीचा विचार काँग्रेसकडे आहे.
रा. स्व. संघाला इंग्रजांची व्यवस्था मान्य होती म्हणून ते स्वातंत्र्य लढाईत सहभागी झाले नाहीत. सर्वांना मताचा अधिकार हेही त्यांना मान्य नव्हते. संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असताना देश हा सर्वांचा आहे हे मान्य करून विषारी व विखारी विचार सोडावा व राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो लावून त्या मार्गाने मार्गक्रमण करावे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
