देवाभाऊ आताबोला, राजु-यात मतचोरी !
देवाभाऊ आताबोला, राजु-यात मतचोरी !
मुंबई, दि. १८ सप्टेंबर २०२५ ;
भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन सत्ता हस्तगत केली आहे. हे काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात ६८५० मत चोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मतचोरी झाली नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करुन पहावे. फडणवीस यांच्याच पोलिसांनी याप्रकरणी एफआयआरही दाखल केला आहे, त्यामुळे मतचोरी करून सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

कोकण विभागातील शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यू. बी. व्यंकटेश, माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अभय छाजेड, प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील कामठी मतदारसंघात मतचोरी कशी करण्यात आली हे काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. आता मतचोरीचा आणखी एक बॉम्ब राहुल गांधी यांनी फोडला आहे. चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघाच्या मतदारयादीत कसा घोटाळा केला? हे आज उघड केले.
निवडणूक आयोग दुटप्पीपणा करत असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरीवर स्पष्ट उत्तर न देता राजकीय पक्षाच्या नेत्याप्रमाणे बोलत आहेत. मतचोरी करून भाजपा व नरेंद्र मोदी यांना भारताचा नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश करायचा आहे, असा गंभीर आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
