‘सारथी’च्या योजनांचा ग्रामीण भागात विस्तार करा..

0
IMG-20250915-WA0164

‘सारथी’च्या योजनांचा ग्रामीण भागात विस्तार करा…

पुणे दि. १५ सप्टेंबर २५ ;

राज्याचे जलसंपदा मंत्री व मराठा आरक्षण संदर्भात स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यातील सारथी संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण भागातील लक्षित गटांपर्यंत योजनांचा विस्तार करणे, युवकांना रोजगाराभिमुख योजना उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी नव्या संधी उपलब्ध करणे यावर सारथी संस्थेच्या माध्यमातून अधिक काम होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या दरम्यान सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील , सदस्य उमाकांत दांगट तसेच सारथीचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. संस्थेच्या विविध योजनांची सद्यस्थिती, अर्जदारांचा प्रतिसाद, ग्रामीण-शहरी भागातील गरजांनुसार आवश्यक बदल व नव्या उपक्रमांचा आराखडा यावर सविस्तर बैठकीत चर्चा झाली.

बैठकीपूर्वी विविध शिष्टमंडळांनी मंत्र्यांची भेट घेऊन आपली निवेदनं सादर केली. या निवेदनांमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व युवकांना अधिक प्रमाणात शिष्यवृत्ती, मार्गदर्शन केंद्रे, कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आणि रोजगार संधी मिळाव्यात, अशा मागण्या पुढे आल्या. मंत्री विखे पाटील यांनी प्रत्येक शिष्टमंडळाचे म्हणणे संयमाने ऐकून घेतले आणि त्यांच्या समस्या लक्षपूर्वक नोंदवल्या.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, “सामाजिकदृष्ट्या मागास घटकांच्या प्रगतीसाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना अधिकाधिक शैक्षणिक व व्यावसायिक संधी मिळायला हव्यात. रोजगाराभिमुख प्रशिक्षण, उच्च शिक्षणासाठी मदत, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आणि आधुनिक कौशल्य विकास यावर संस्थेने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.”

पुढील काळात ग्रामीण भागात संस्थेच्या शाखा किंवा समन्वय केंद्रे सुरू करण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *