कराड कुटुंबीयांची भुजबळांनी घेतली सांत्वनपर भेट…

0
FB_IMG_1757679266152

कराड कुटुंबीयांची भुजबळांनी घेतली सांत्वनपर भेट…

लातूर, दि.१३ सप्टेंबर:-

OBC च्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहोत. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था असून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आपण न्यायालयीन आणि प्रसंगी रस्त्यावरील दोन्ही लढाया देखील लढू. कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

स्व.भरत महादेव कराड या लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील तरूणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून जीवन संपवलं. आज मंत्री छगन भुजबळ यांनी कराड कुटुंबीयांची त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली.

यावेळी माजी मंत्री धनंजय मुंढे, आमदार रमेश कराड, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे, ॲड.सुभाष राऊत, सरपंच विजय गंभिरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यांनी स्वर्गीय भरत कराड यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी स्व.भरत यांच्या लहानग्या मुलाला पाहून मंत्री छगन भुजबळ यांना गहिवरून आले. त्यांनी या लहानग्या मुलाचे अश्रू पुसत कुटुंबियांना धीर दिला आणि आर्थिक मदत कुटुंबियांना सुपूर्त केली. यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्व.भरत कराड यांनी ओबीसींचा ध्यास घेतलेला होता. जिथे जिथे ओबीसीच्या सभा व मेळावे असायच्या तिथ तिथं ते जात होते. ओबीसी समाजच आरक्षण कमी होता कामे नये ही त्यांची भावना होती. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. गरीब ओबीसींच्या ताटात वाटेकरी नको असे त्याला वाटायचे असे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांप्रमाणे लढा द्या. या देशात आणि राज्यात लोकशाही आहे. इथे कोणाचीही दादागिरी चालणार नाही. सर्व अठरा पगड जातींनी एकत्र रहा, एकजूट ठेवा. ओबीसींच आरक्षण टिकवण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत. त्यामुळे कुठल्याही ओबीसी बांधवाने आत्महत्या करू नये. आपल्या लेकरा बाळांचा विचार करून कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये. आम्ही आमची जबाबदारी निश्चितपणे पार पाडू जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लाऊ देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी घटकाला आरक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे संविधानात म्हटले. त्यानंतर मंडल आयोगाने अभ्यास करून २७ टक्के आरक्षण दिले. मराठा समाज्याला ओबीसी मध्ये आरक्षण देता येणार नाही असे अनेक आयोगांनी सांगितले. केंद्र सरकारने मराठा समाजाला १० टक्के EWS आरक्षण दिले. राज्य सरकाने १०टक्के स्वतंत्र SEBC आरक्षण दिले. शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी शासनाने मराठा समाजाला ओबीसींना पेक्षा जास्त योजना लागू केल्या आहे. मात्र यांना ओबीसी मध्येच यायचे आहे, असा काहींचा हट्ट आहे. त्यामुळे प्रेशर खाली हा जीआर निघाला. हा gr ओबीसींच्या मुळावर घाव आहे.

लोक म्हणतात आता संपलं आपलं आरक्षण त्यामुळे लोक आत्महत्या करुन बलिदान देत आहेत. आम्ही कोर्टासह रस्त्यावरची सुद्धा लढाई लढू. छत्रपती शिवजी महाराजांच्या मावळ्यांच्या प्रमाणे धैर्याने, संयमाने आणि एकजुटीने हा लढा देऊ.” आणि ओबीसींच्या मागे खंबीर उभे राहू, त्यामुळे कोणीही आत्महत्या सारखे पाऊल उचलू नये असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात ओबीसींच्या लेकरा बाळांना शिक्षण नोकऱ्या नको आहे का ? अनुदान देताना आणि योजना राबविताना ओबीसींवर घोर अन्याय होत आहे. जी मागणी संविधान विरोधी आणि न्यायालयाच्या विरोधात आहे त्यासाठी अख्खा महाराष्ट्र वेठीस धरला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *