हाथरसच्या निमित्ताने:समाज व माध्यमे दांभिक आहेत!

0
20200930_130539
मुंबई, दि. 30 सप्टेंबर:
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या बलात्काराची घटना नेमकी तुम्हाला कधी कळली. हा प्रश्न उपस्थित करायचे कारण आपणाला ज्या माध्यमातून अशा घटना कळतात त्यांनीच जर अशा घटनांकडे दुर्लक्ष सुरू केले असेल तर ते सर्वसामान्य लोकांना कळणार तर कसे?
तर ही घटना १४ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी साडे दहा वाजता हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलिस ठाण्याच्या परिसरात घडली. सुरुवातीला टाळाटाळ करणा-या पोलिस प्रशासनाने याप्रकरणी चौघांना अटक केली. आधी अलिगढमध्ये त्या मुलींवर उपचार सुरू होते पण तिची प्रकृती खराब झाल्यानंतर  दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. २९ सप्टेंबरला तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रात्री उत्तर प्रदेशातील सगळ्या प्रशासकीय यंत्रणेने तिच्यावर अंत्यसंस्कार केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली व सात दिवसाच्या आत अहवाल मागितला. झाले…!!
एवढ्या सहज संपले पाहिजे का हे प्रकरण? नाही हे विचारायचे कारण म्हणजे काही प्रकरणे ही अशीच संपतात ( कथुआ येथील असिफा प्रकरण असो, की हाथरसमधील हे प्रकरण असो ). तर काही प्रकरण जाणीवपुर्वक मोठे रुप धारण करतात किंवा केली जातात. मी आधी स्पष्ट करू इच्छितो की बलात्कार, महिलांवरील अत्याचाराबाबत मी फारच संवेदनशील आहे. कोणत्याही महिलेच्या बाबतीत असे होवू नये या मताचा मी आहे. पण अशा घटना घडल्यानंतर प्रत्येक घटनेवर समाजाची, माध्यमांची एकसारखी प्रतिक्रिया नसते. आणि याच गोष्टीला माझा तीव्र आक्षेप आहे.
१४ सप्टेंबरला घटना घडल्यानंतर किती माध्यमांनी याची दखल घेत त्या मुलीला न्याय देण्यासाठी मोहीम चालवली. स्थानिक माध्यमांनी त्याबाबत रिपोर्टींग केले. पण या प्रकरणाला खरी वाचा फोडली ती सोशल मीडियाने, दिल्लीतील रोहिणीसिंग सारख्या महिला पत्रकारांनी. याप्रकरणाच्या बातम्या वारंवार सोशल माध्यमात आणून याची दखल घेण्यास भाग पाडले.  मुख्य माध्यमे याकाळात काय दाखवत होती, हे जनतेने पाहिले आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरण ते ड्रग्ज रॅकेटपर्यंतच्या सर्व बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. यात कधी एखादी हाथरसची बातमी लागून गेली पण असेल. पण ती लक्षात राहिली का, नाही ना ? मग इतर काही बलात्कार प्रकरणे मात्र कशी काय मोठी होतात. एका मुलीवर बलात्कार झाला, तिची हत्या झाली तर प्रत्येकवेळी त्याच तीव्रतेने बातमी, प्रतिक्रिया आल्या पाहिजेत ना.मग त्या का येत नाहीत?
हैदराबादमध्ये बलात्कार करून हत्या झाली त्याच्या तीव्र प्रतिक्रिया आल्या.माध्यमांच्या अतिरिक्त दबावात संशयित आरोपींना गोळ्या घालून मारण्यात आले.
( एन्काउंटर व झटपट न्यायावर माझा अजिबात विश्वास नाही, भारतीय न्याय व्यवस्थेने जी व्यवस्था केली आहे त्यानुसार न्याय मिळाला पाहिजे या मताचा मी आहे.) निर्भया प्रकरणावेळच्या प्रतिक्रिया देखील आठवत असतील. पण अशा प्रतिक्रिया हाथरस, कथुआ, कुलदीप सिंग सेंगर प्रकरणात का येत नाहीत? माध्यमे, समाज त्यावेळी का गप्प बसतो? त्यावेळी का ठरावीक समाजातील लोकच आवाज उठवत असतात. माध्यमे भयंकर पक्षपाती झाली आहेत. हे माध्यमात काम करत असून देखील ठामपणे सांगतो. अनेकवेळा अशाप्रकाराचा व त्यावरील प्रतिक्रियाचा मी स्वत: साक्षीदार राहिलो आहे.
माध्यमात ठराविक समाजाला, लोकांना काडीचे स्थान नाही. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या दररोजच्या बातम्या, अजेंड्यावर दिसून येते. जर  माध्यमांची व समाजाची महिला अत्याचाराबाबात एवढीच टोकाची प्रतिक्रिया असती तर त्या मुलीला त्याच दिवशी दिल्लीतील एम्समध्ये हलवले असते, तिचे प्राण वाचवले असते. पण तसे झाले नाही. कारण समाज व माध्यमे दांभिक आहेत. ते प्रत्येक घटनेला एका वेगळ्यादृष्टीने पाहतात, त्यात त्यांना ठरलेला अँगल दिसला की ते व्यक्त होण्यास सुरूवात करतात. गेल्या काही वर्षात युपीमध्ये किती एन्काउंटर झाले. त्यात मेलेल्या व्यक्तींची आकडेवारी काढल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल की माध्यमे किती दांभिक आहेत. सत्ताधारी किती एकांगी झाली आहेत. त्यामुळेच जोपर्यंत चंद्रशेखर आझाद सारखा एक नेता सरकारी रुग्णालयात जावून त्या मुलीचा व्हिडिओ बनवत नाही. तोपर्यंत आपल्याला असे काही झाले आहे. हेच कळत नाही.
मरतात ना, मरू दे ही आपली भूमिका आपल्याला विनाशाकडे घेवून गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. जर प्रत्येक घटनेला आपण हिंदू मुस्लिम, दलित सवर्ण अशा बाजूने बघत राहू तोपर्यंत काहीही बदलणार नाही. एक सजग समाज म्हणून आपल्याला प्रत्येक वाईट, चुकीच्या बाबीवर बोललेच पाहिजे. ती एका समाजाची आहे, आरोपी वेगळ्या समाजाचे आहेत म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेवू लागला तर प्रत्येकजण आपआपल्या दृष्टीने भुमिका घेवू लागेल. भारतीय मेन स्ट्रीम मुख्य माध्यमे समाजाच्या एक टक्काही कामाची राहिलेली नाही. ते फक्त आपला अजेंडा आणि आपले पोट भरण्याचे काम करत आहेत. जी माध्यमे तुमची बाजूू मांडत आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची हीच वेळ आहे. नाही तर तुम्हाला उद्या कोणी मारून जरी टाकले तरी लोकांना कळणार नाही.
हीच घटना महाराष्ट्रामध्ये घडली असती तर किती हॅशटॅग चालवले असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *