लोढा व अदानींच्या बिल्डिंगमध्ये आदर्श कबुतरखाना उभारा!

0
IMG-20250801-WA0211

लोढा व अदानींच्या बिल्डिंगमध्ये आदर्श कबुतरखाना उभारा!

मुंबई, दि. ६ ऑगस्ट २०२५:
मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी त्यांच्या जागेतच एक आदर्श कबूतरखाना उभारून करुणेचा नवा आदर्श घालून द्यावा असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

कबूतरांच्या मुद्द्यावरून भाजपा युती सरकारचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कबुतरांमुळे फुप्फुसाचे गंभीर आजार होत असल्याचे निदर्शनास आल्यावरून न्यायालयाने ते हटवण्याचे आदेश दिलेले आहेत. पण हे कबुतरखाने हटवू नका अशी मागणी जैन समाजातून होत आहे. नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पण सरकार जाणीवपूर्वक अशा वादाला खतपाणी घालत आहे. भाजपा युती सरकारचे काम म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर असे आहे. राज्यात शेतकरी संकटात आहे, तरुण मुलामुलींना नोकऱ्या नाहीत, महागाई प्रचंड वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकारच असे वाद उकरून काढत आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, दादरच्या कबुतरखाना येथे झालेल्या आंदोलनात बाहेरचे लोक होते असे सांगितले जात आहे पण हा सुद्धा बनाव आहे. राज्यात कोठेही काहीही घटना घडली की बाहेरच्या लोकांनी ती घडवून आणली हे ठोकळेबाज उत्तर देऊन सरकार आपले अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *