संत नामदेव महाराज पुरस्काराने एकनाथ शिंदेंचा सन्मान.
संत नामदेव महाराज पुरस्काराने एकनाथ शिंदेंचा सन्मान.
पंढरपूर, दि. २५ जुलै २०२५:
नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका देशभर नेली आणि तिथं रुजवली , वाढवली. वारकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारे नामदेव महाराज केवळ महाराष्ट्राचेच नाही तर अखिल विश्वाचे संत होते. संत नामदेव महाराजांनी मराठीला अडीच हजार अभंगांचे देणं दिले. आता हे संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करु, अशी ग्वाही शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पंढरपूर येथील संत नामदेव महाराज जन्मस्थान वाडामधील केशवराज मंदिरात उपमुख्यमंत्री शिंदे यांचा संतशिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्याला आमदार समाधान अवताडे, आमदार अभिजित पाटील, गुरुमहाराज चैतन्यस्वामी देगलुरकर, निवृत्ती महाराज, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, भक्तशिरोमणी संत श्री नामदेवमहाराजांचे वंशज व परिवार सदस्य, वारकरी संप्रदायातले प्रमुख कितर्नकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यापूर्वी अनेकवेळा मी पंढरपुरात येऊन गेलो, पण आजचे वातावरण बघून मन भरुन गेले. संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थानी हा सोहळा होतोय, या वाड्यात अनेक संतांचे वास्तव्य होते. प्रत्यक्ष पांडुरंगाने इथं सेवा केली. त्यामुळे इथं पुरस्कार मिळणं हे मोठं भाग्य समजतो. हे स्थान म्हणजे वारकऱ्यांचे चालते बोलते विद्यापीठ आहे. नामदेव महाराजांच्या नावे हा पुरस्कार म्हणजे कृतार्थ होण्याचा आणि नतमस्तक होण्याचा आजचा क्षण आहे, असे ते म्हणाले. मला काय मिळालं यपेक्षा समाजाला काय देणं लागतो ही भावना ठेवून आजवर काम केले. हा पुरस्कार माझ्या सर्व सहकाऱ्यांचा, माझ्यावर प्रेम करणाऱ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा पुरस्कार असल्याची भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. संत सजन्नांनी आणि लाखो वारकऱ्यांनी दिलेला हा पुरस्कार रुपी आशिर्वाद आहे. मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणून काम केलं आता डीसीएम अर्थात डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करतोय, असे ते म्हणाले. बाळासाहेब, दिघे साहेब सांगायचे संत सेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि त्याच मार्गाने आपण पुढे जातोय, असे ते म्हणाले.
