स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला..
मुंबई, दि. ६ जुलै २०२५ :
मराठी भाषेबद्दल राज ठाकरेंची तळमळ दिसून आली तर उद्धव ठाकरेंच्या भाषणात आगपाखड, द्वेष, जळजळ, सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मळमळ दिसून आली. त्यांनी मराठीचा नाही तर स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी UBT वर सडकून टीका केली. ते म्हणाले की, काहीजण झेंडा नाही, अजेंडा नाही असे बोलत होते. मात्र एकाने ते पथ्य पाळलं तर दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला. आजच्या मेळाव्यातून मराठी माणसांची निराशा झाली, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी अन्यायाविरोधात आम्ही उठाव केला आणि दाढीवरुन अर्धाच हात फिरवला होता, तेव्हा ते आडवे झाले जे अद्याप सावरलेले नाहीत. आता कोणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. धो डाला, उठेगा नहीं साला वैगरे बोलणं त्यांना शोभत नाही, यासाठी मनगटात ताकद लागते, तोंडाच्या वाफा सोडून होत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
मराठीसाठी काय केलं असे विचारणाऱ्यांना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री असताना राज्यगीताचा आम्ही निर्णय घेतला, त्या राज्यगीताने सोहळ्याची सुरुवात झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ होकार दिला. आज पंतप्रधान मोदींवर देखील टीका करण्यात आली, हे दुर्दैव आहे. यातून त्यांची वृत्ती, द्वेष आणि सत्तेसाठीची लाचारी आणि लालसा दिसून आली, अशी टीका शिंदे यांनी केली.
मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला का गेला, मराठी टक्का कमी का होत गेला याच उत्तर उबाठाने द्यायला हवे. २०१९ मध्ये बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून विधानसभेत जनतेने त्यांची जागा दाखवली. शिवसेनेचे ६० आमदार जिंकले, उबाठा १०० लढून केवळ २० जागांवर निवडून आले. खुर्चीसाठी उबाठाने २०१९ मध्ये जनतेसोबत, बाळासाहेबांच्या विचारांसोबत आणि हिंदुत्वासोबत विश्वासघात केला होता असेही शिंदे म्हणाले.
