उद्धव ठाकरेंनी सेना, शिव व हिंदुत्व सोडले!
उद्धव ठाकरेंनी सेना, शिव व हिंदुत्व सोडले!
मुंबई, दि. २० जून २५;
शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीने ओकलेली हतबलताच होती. जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात. तेच त्यांनी केले असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “शिवसेना संपली नाही” म्हणत असताना, स्वतःतर ‘सेना’ गमावलीच पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभही सोडून उद्धव ठाकरे सोनिया गांधी यांच्या चरणी नतमस्तक झाले. नरेंद्र मोदी-अमित शाह- देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आरोप करणं सोपं आहे, पण हे नेते जेव्हा देशभर,राज्यभर दौरे करत होते, तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीतून ऑनलाईन भाषण करत होते. हे महाराष्ट्रातील जनतेनं बघितलेलं आहे.
बावनकुळे पुढे म्हणाले की ‘मुंबई आमची’ म्हणतात, त्यांनी आधी सांगावं की, मुंबईतल्या मराठी माणसाचं काय केलं? महापालिकेत सत्ता असतानाही त्यांच्या झोपड्या, पाण्याच्या योजना, शिक्षण, आरोग्य यावर काही केलं का?” मुंबईकरांसाठी कोस्टल रोड, मेट्रो, क्लस्टर रिडेव्हलपमेंट, झोपडपट्टी पुनर्वसन योजना या देवेंद्रजींच्या पुढाकारानं झाल्यात हे मुंबईकरांना माहित आहे.
मुंबई आमची आहे, हे तुम्ही ओरडून सांगत राहा, पण विकास, सुरक्षितता आणि सन्मान हवा असेल, तर मुंबईवर भाजपा- महायुतीचाच झेंडा फडकला पाहिजे हीच मुंबईकरांची इच्छा आहे! उद्धव ठाकरे अशीच गरळ ओकत रहा, टिंगल- टवाळी करीत रहा, टोमणे मारीत रहा. तुमचे पुढील आयुष्य यातच जाणार आहे. लोकसेवा आणि लोककल्याणासाठी मनात तळमळ असावी लागते, ती तुमच्यात नाही. ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला यापूर्वीच कळलेली आहे. आता पुढील निवडणुकांमध्ये जनता त्यावर शिक्कामोर्तब करेल असेही बावनकुळे म्हणाले.
