सोलापूर जिल्ह्यातील दुसरा माजी आमदार शिंदेसेनेत..

0
IMG-20250611-WA0013

सोलापूर जिल्ह्यातील दुसरा माजी आमदार शिंदेसेनेत..

मुंबई, दि. ११ जून २०२५;

सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. तीन चार दिवसापूर्वी काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्यानंतर जिल्ह्यातील दुस-या माजी आमदाराने शिंदेसेनेत प्रवेश केल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सोलापूर जिल्ह्यात ताकद वाढली आहे.

जयवंतराव जगताप दोनवेळा करमाळ्याचे आमदार होते. 1990 साली अपक्ष तर 2004 साली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ते आमदार झाले होते. 2019 साली विधान सभेला संजय शिंदे यांना विजयी करण्यात व 2024 साली नारायण पाटील यांना विजयी करण्यात जयवंतराव जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. माजी आमदार जगताप यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक देशभक्त स्व. नामदेवराव जगताप चार वेळा व चूलते अण्णासाहेब जगताप एक वेळेस आमदार होते. जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला फार मोठा लाभ होणार आहे. लवकरच करमाळा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा भव्य मेळावा होणार असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे विकासाचा दृष्टिकोन असलेले नेतृत्व असून त्यांच्याच नेतृत्वाखाली धनुष्यबाण चिंन्हावर करमाळा नगर पालिकेवर, पंचायत समितीवर आणि येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत भगवा फडकविणार असल्याचा निर्धार माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी (बापू) पाटील, शिवसेनेचे करमाळा – माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सांगलीचे विठ्ठल पाटील ,सिंदखेडराजा जि.बुलढाण्याचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *