पक्षात फूट पडेल असं कधी वाटलं नव्हतं पण….
पक्षात फूट पडेल असं कधी वाटलं नव्हतं पण….
पुणे, दि. १० जून २०२५;
राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणुका दोन- तीन महिन्यांवर आलेल्या आहेत. इथे ५० टक्के भगिनींना निवडून द्यायचंय. कर्तृत्वाचा मक्ता हा फक्त पुरुषाकडे असतो यावर माझा विश्वास नाही. भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात, संधी दिली पाहिजे. ते आपण अनुभवलं. उद्याच्या निवडणुकीमध्ये ५० टक्के जागा भगिनींना द्यायच्या, तो धोरणात्मक आपण घेतला आहे असे शरद पवार यांनी सांगितले.

बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिन सोहळ्यात शरद पवार बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की, दोन- तीन महिन्यांत या निवडणुका येतील, त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्या- जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यातलं जे नेतृत्व आहे त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या निवडणुका कशा लढवायच्या? एकट्याने लढवायच्या? काही लोकांना बरोबर घेऊन लढवायच्या? याचा विचार त्या जिल्ह्यातल्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन करण्याची वेळ आज आलेली आहे. हे जर आपण करू शकलो तर माझी खात्री आहे, आणखी एक मोठी नव्या पिढीची, नव्या नेतृत्वाची फळी ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या- जिल्ह्यांत दिसेल. ते काम आपल्याला करायचं आहे. हा आजचा कार्यक्रमाचा सोहळा संपल्यानंतर पुढचे तीन महिने सगळं लक्ष तुमचं तुमच्या भागामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं? ५० टक्के भगिनींच्या जागेमध्ये कर्तुत्ववान आणि आत्मविश्वासाने उभ्या राहिलेल्या मुली कशा पुढे आणायच्या? या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करा.
माझी खात्री आहे की, जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फळी आहे ती याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी राहील. आपण येत्या तीन महिन्यांच्या निवडणुकीच्यानंतर सबंध महाराष्ट्रासमोर नवी नेतृत्व आणू आणि त्यांच्या कर्तृत्वातून इतिहास घडवू, एवढाच विश्वास बाळगतो असे पवार म्हणाले.
तुम्हा सगळ्यांनी पक्षामध्ये काही संकट आली तरी नाउमेद न होता हा पक्ष पुढे नेण्याचं काम केलं. पक्षामध्ये फूट पडली. फूट पडेल असं कधी आपल्याला वाटत नव्हतं, पण पडली. काही मूलभूत विचारांसंबंधी अंतर झालं आणि त्यामुळे ही फूट वाढली. मी काही त्याच्यासंबंधी अधिक भाष्य करू इच्छित नाही. पण जे राहिले ते विचाराने राहिले. जे राहिले ते विचार घेऊन पुढे जनतेला, त्यांच्या सुखदुःखाला साथ देण्यासाठी राहिले. मला १००% विश्वास आहे की, उद्या निवडणुका होतील त्यावेळेला वेगळं चित्र बघायला मिळेल असेही शरद पवार म्हणाले..
