विचारांशी कधी तडजोड करणार नाही..
विचारांशी कधी तडजोड करणार नाही..
पुणे, दि. १० जून –
महाराष्ट्राचा विकास हाच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा राहणार आहे असे जाहीर करतानाच याअगोदरही राज्य आणि देशासाठी काम करत होतो आणि यापुढेही करत राहू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे या निश्चित धोरणाने काम करतोय असे सांगतानाच लोकांमध्ये मिसळा सुख दु:खात सहभागी व्हा.यापुढे पक्षाची कार्यालये गजबजलेली दिसली पाहिजेत असे आवाहनही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

महाराष्ट्राची अस्मिता जपताना देशाची उज्ज्वल प्रगती ही राष्ट्रवादी काँग्रेसने बघितली आणि आज बघता बघता २६ वर्षात पदार्पण करत आहे. आज वर्धापन दिन पुण्यात साजरा होत आहे यापुढे वेगवेगळ्या जिल्ह्यात साजरा करण्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.
आम्ही भाजपसोबत गेलो म्हणून टिका करतात पण आम्ही २०१९ मध्ये शिवसेनेसोबत गेलो होतो की, त्यावेळी तडजोड केली होती ना. मग आता टिका कशासाठी केली जात आहे असा सवाल करतानाच आपण लोकांना दिशा दाखवणारे व बेरजेचे राजकारण करणारे आहोत हेही आवर्जून अजित पवार यांनी स्पष्ट केले.
काही लोक जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी फिरवला म्हणून टिका करत आहेत. आदिवासी विकास विभागाला ४१ टक्के निधी नाही. लोकांशी संवाद साधला. त्यात आमचे काय चुकले याचा अभ्यास करून त्यानंतर लाडकी बहीण योजना आणली. जेवढे आपल्याला झेपेल तेवढेच केले. सर्व सोंगे करता येतात परंतु पैशाचे सोंग करता येत नाही हे सर्व बघून हा निर्णय यशस्वी झाला आहे असेही अजित पवार म्हणाले.
काही बातम्या सोडतात… अजित पवार पैसे सोडत नाहीत.. अरे मी काय पैसे खिशात घेऊन फिरतो का? .. असा संतप्त सवाल अजित पवार यांनी करतानाच तीन टप्प्यात निधी कसा सोडावा लागतो हे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांवर चालत आहे. या विचारांशी कधी तडजोड करणार नाही आणि हा तडजोडीचा विचार मनात येईल त्यावेळी पायाला तडा गेल्याशिवाय राहणार नाही असेही अजित पवार यांनी जाहीर केले.
राष्ट्रवादीमध्ये कट्टरवाद असता कामा नये. येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असून एकता, समता, बंधुता, शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात टिकून आहे. जोपर्यंत आम्ही महायुतीमध्ये काम करतोय तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे थांबवणार नाही असा शब्द अजित पवार यांनी दिला.
