मोदींच्या नेतृत्वात भारत आर्थिक महासत्तेच्या उंबरठ्यावर..

0
IMG-20250610-WA0118

मोदींच्या नेतृत्वात भारत आर्थिक महासत्तेच्या उंबरठ्यावर..

मुंबई, दि. ११ जून २०२५;

काँग्रेस काळातील घोटाळ्यांनी बेजार झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. २०१४ पूर्वी अकराव्या क्रमांकावर असणाऱ्या भारताने नुकताच चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. लवकरच भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. मोदींच्या नेतृत्वात भारत आर्थिक महासत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे कौतुकोद्गार शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

 

 

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार (एनडीए) आणि पंतप्रधानपदाला ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ते म्हणाले की बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेना विश्वासू घटक पक्ष म्हणून ‘एनडीए’ सोबत राहिली. आजही पंतप्रधान मोदींसोबत शिवसेना खंबीरपणे उभी आहे.

 

 

२०१४ साली नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, त्यापूर्वी देशात काँग्रेसच्या घोटाळ्यांची मालिका सुरु होती. चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळ्यांनी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. मात्र मागील ११ वर्षांत मोदींजींवर एकही भ्रष्टाचाराचा डाग नाही, ही वस्तुस्थिती आहे. याकाळात मोदीजींनी भारताला विश्वगुरु करण्याचा प्रयत्न केला, त्याचा सार्थ अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. भारताने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर य़शस्वीपणे यान उतरण्याची किमया करुन दाखवली, आता मंगळावर जाण्याची तयारी सुरु आहे. एकीकडे विकास तर दुसरीकडे अवकाश तंत्रज्ञानातील ऐतिहासिक कामगिरी करुन भारताची महासत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

 

ते पुढे म्हणाले की, २०१४ पूर्वी तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी युद्ध झाल्यास भारत १० दिवसांहून अधिक काळ तग धरु शकत नाही, अशी कबुली दिली होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. मोदीजींनी भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवलं. भारतात युद्धनौका बनवली, ब्राम्होस क्षेपणास्त्र तयार केले. टाटा समूहासोबत आता भारतातच राफेल विमाने तयार होणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर मोदीजी यांनी नवा भारत काय असतो, हे पाकिस्तानला घरात घुसून मारले आणि दहशतवाद्यांना जशास तसा धडा शिकवला. नव्या भारतात देशाच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड करणार नाही, हे मोदींनी दाखवून दिले. ऑपरेशन सिंदूरमधून जगाला ब्राम्होस क्षेपणास्त्राची ताकद दाखवली. काँग्रेसने कायम व्होट बँकेचे राजकारण केले तर मोदीजींनी विकासाचं आणि देशभक्तीचे राजकारण केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

 

काँग्रेसच्या ५० वर्षांच्या काळात पायाभूत सुविधा, विमानतळं, रेल्वे, रस्ते, पोर्ट यांची कामे झाली नाहीत. मात्र २०१४ मध्ये ७४ विमानतळे होती आता १४१ विमानतळे सुरु आहेत. मोदींजींच्या पाठिंब्यामुळेच महाराष्ट्राला १० वर्षात केंद्र सरकारकडून १० लाख कोटींचा निधी मिळाला,असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. काँग्रेसने इतकी वर्ष गरिबी हटावचा नारा दिला पण गरिबी हटली नाही गरिब मात्र हटला, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. मात्र मागील १० वर्षात २७ कोटी लोकांना दारिद्ररेषेवर आणले, ८० कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला. कल्याणकारी योजनांमधून अन्न, वस्त्र, निवारा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *