IMG-20250606-WA0049

राहुल गांधींचे आरोप म्हणजे ….!

ठाणे,दि. ७ जून २५ :-

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव म्हणजे गिरे तो भी टांग उपर असा प्रकार आहे. देशात ज्यांची उरली नाही पत ते व्यक्त करतायत आपले मत असेच राहुल गांधी यांचे आरोप वाचले की खेदाने म्हणावे लागते असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपांना उत्तर देताना शिंदे यांनी ही टीका केली. शिवसेनेत नाशिक, लातूर अहिल्यानगर येथील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची ‘भारत जोडो’ यात्रा राज्यात देखील येऊन गेली मात्र येथील जनतेने त्यांना साथ दिली नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत आरक्षण जाणार, संविधान बदलणार असे फेक नेरेटिव्ह पसरवून त्यांचे जास्त खासदार निवडून आले. तेव्हा मात्र त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतले नाही. तेव्हा मतदार बरोबर होते निवडणूक आयोग बरोबर होता. मात्र त्यानंतर महायुती सरकारने सावध होत व्यवस्थित नियोजन केले. फेक नेरेटिव्ह पसरत असेल तर ते वेळोवेळी खोडून काढले. गेली अडीच वर्षे सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणी लाडके भाऊ त्यांनी महायुती सरकारला साथ दिली. त्याबळावर महायुतीला लँड स्लाईड मतांचे दान मिळाले. मात्र आज काहीजण त्यावर आक्षेप घेत आहेत.

एकीकडे परदेशात जाऊन आरक्षण जाईल म्हणायचे, देशाची बदनामी करायची, ऑपरेशन सिंदूरबाबत प्रश्न निर्माण करून संभ्रम निर्माण करायचा आणि आता पारदर्शकपणे राबवलेल्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घ्यायचा हे सर्वस्वी चुकीचे आहे. त्यामुळे अशाप्रकारे आरोप करणाऱ्यांना जनता विसरणार नाही उलट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष उरलासुरला जनादेश देखील गमावून बसेल अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *