छे, छे, विलिनीकरणाबाबत प्रस्तावच नाही !

0
images - 2025-01-14T231345.488

छे, छे, विलिनीकरणाबाबत प्रस्तावच नाही !

मुंबई दि २९ मे २५ –
शरद पवार व अजित पवार यांचे दोन्ही गट एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. आता दस्तुरखुद्द पवार काकांनीच तसे संकेत दिल्यावर चर्चा तर होणारच ..पण अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणतात.. आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव र आलेला नाही आणि आमच्या विचारार्थही नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमध्येच राहणार आहोत या भूमिकेशी ज्यांना समरस व्हायचे असेल किंवा या भूमिकेबरोबर वाटचाल करायची असेल त्यांचे जरुर पक्षात स्वागत आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा मुद्दाच नाही.

तटकरे म्हणतात,  आज त्या गोष्टीची चर्चा आमच्या स्तरावर नाही. त्याबद्दल भाष्य करण्यात काय अर्थ आहे.ज्या क्षणापर्यंत विलिनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर आला नाही. त्याची चर्चाही नाही. त्यामुळे विरोध असणे… अनुकूल असणे… प्रतिकूल असणे… हा प्रश्नच उद्भवत नाही. आमचा पुढचा राजकीय प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्यामुळे त्यात बदल होण्याचे कारण नाही असेही सुनिल तटकरे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

राष्ट्रवादीत २०१४ पासूनच माझ्या वेगवेगळ्या मुलाखतीत बोललो आहे की, आम्ही हा निर्णय घेईपर्यंत भाजपसोबत सरकारमध्ये किंवा सत्तेमध्ये सोबत जायचे याबाबत अनेकवेळा चर्चा झाली होती. अनेक प्रसंग, निर्णय टप्प्यापर्यंत पोचले होते. परंतु त्यावेळी निर्णय होऊ शकला नाही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज आम्ही घेतलेली भूमिका आणि त्यात विलिनीकरण हे दोन ध्रुवावरील विषय दिसतात. माझा विरोध… प्रफुलभाईंचा विरोध… हा मुद्दा त्यामध्ये नाहीच आहे. मुळ मुद्दा आहे की, असा प्रस्ताव कुठे आहे ही माहिती तुम्ही मला सांगितली तर मी दुर्बिण लावून शोध घेईन असेही सुनिल तटकरे यांनी मिश्कीलपणे सांगितले.

सत्तेमध्ये सहभागी होण्याचा आमचा निर्णय कलेक्टिव होता. अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे या सर्वांनी घेतला, आमदारांची साथ मिळाली. राज्यातील जनतेची मोठी साथ मिळाली. लोकसभेनंतर आम्ही कुणाच्या खिजगणतीत नव्हतो. फक्त पाच – सहा जागा मिळतील असे बोलले जात होते. मात्र परिश्रमपूर्वक मेहनत घेतली. जनसन्मान यात्रा काढली आणि राज्यात वातावरण निर्माण झाले. लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी झाली. अनेक निर्णय झाले आणि पक्ष म्हणून प्रभावीपणाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवली आणि शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारापासून तसूभरही मागे पडलो नाही. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यामुळे जनतेने भरभरून जागा आम्हाला दिल्या हेही सुनिल तटकरे यांनी आवर्जून स्पष्ट केले.

लोकसभेनंतर आम्ही राहतो की नाही असा प्रश्न निर्माण केला जात होता. आता त्या सर्व प्रश्नांची उत्तरे राजकीयदृष्ट्या राज्यातील जनतेने दिली आहेत. त्यामुळे जर – तरच्या मुद्द्यावर मी प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे कुठलेही वक्तव्य करणे चुकीचे ठरेल. एकदा नक्की कळूदे की, प्रश्न विलिनीकरणाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर चर्चेला आला मग पुढच्या बाबी येतील. परंतु जे नाहीच आणि दिसत नाही त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे. त्यामुळे आता सूत्रांच्या बातम्या…किंवा ती सुत्रे आम्हाला शोधावी लागतील असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर हसतच सुनिल तटकरे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *