मुंबईच्या गटार सफाईत प्रचंड भ्रष्टाचार.

0
varsha jj

मुंबईच्या गटार सफाईत प्रचंड भ्रष्टाचार.

मुंबई, दि. २८ मे;

मुंबईत पहिल्याच पावसात पूरस्थिती निर्माण झाली, त्याला भाजपा युतीचे भ्रष्ट सरकार व बीएमसी जबाबदार आहे. गटार सफाई कामकाजातील ठेकेदार व सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्ट युतीने मुंबईकरांच्या पैशावर डल्ला मारून मुंबईची तुंबई केली. गटार साफसफाईचे काम हे केवळ एक ढोंग असून हातसफाई केली आहे. मॉन्सूनपूर्व कामांत मोठा भ्रष्टाचार झालेला असून त्याची एसीबी मार्फत चौकशी करावी व या विषयावर श्वेतपत्रिका काढून दाखवा, असे खुले आव्हान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, गटार सफाईच्या कामात बनवाबनवी कशी केली जाते हे उघड झाले आहे. काही प्रसिद्धी माध्यमांनी बीएमसी, राज्य सरकार व ठेकेदार यांच्या कारनाम्याची पोलखोल केली आहे. बांधकामातून उरलेला मलबा हा गटारातून काढलेल्या गाळासारखा दाखवला जातो, जो ओला असतो आणि गाळासारखा दिसतो, त्यालाच “काळा माल” म्हणतात म्हणजे गटारं प्रत्यक्षात स्वच्छ केली जात नाहीत. ठेकेदार बीएमसीच्या कनिष्ठ अभियंत्यांसाठी मोबाईल खरेदी करतात आणि नंतर ते मोबाईल स्वतः वापरतात, त्यातूनच गटार सफाईची प्रगती दाखवणाऱ्या बीएमसी अ‍ॅपवर नोंदी केल्या जातात. लॉगशीट आणि इतर सगळी कागदपत्रे ठेकेदार स्वतः तयार करतो, संबंधित बीएमसी अधिकाऱ्याला फक्त ५०० रुपये देऊन सही करून घेतली जाते. त्यापलीकडे त्या अधिकाऱ्याची काहीही भूमिका नसते. हे अधिकारी साइटवर जात नाहीत आणि कामाची पाहणीही करत नाहीत, सर्व कामे ठेकेदारच करतो.

मुंबईत नालेसफाईच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार करण्यात आला असून केवळ कागदपत्रे रंगवून साफसफाईचे पैसे लाटले आहेत. आम्ही आधीपासून या भ्रष्टाचारावर बोलत आहोत आणि आज तेच सिद्ध झाले आहे. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये बीएमसीच्या ‘एस’ वॉर्ड मधील कामाची पोलखोल दाखवलेली आहे, त्याची सखोल चौकशी तर झालीच पाहिजे पण त्यासोबतच सर्व वॉर्डातील कामकाजाचीही चौकशी करून सविस्तर अहवाल जनतेसमोर सादर करा. मुंबईला कोण व कसे लुटत आहे हे मुंबईकरांना समजले पाहिजे, मुंबईकरांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना जेलची हवा दाखवण्याची धमक सरकारने दाखवावी, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *