मुंबईच्या नालेसफाईत भ्रष्टाचार, ‘ACB चौकशी करा.

0
IMG-20250524-WA0159

मुंबईच्या नालेसफाईत भ्रष्टाचार, ‘ACB चौकशी करा.

मुंबई, दि. २५ मे २५ ;

मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी भाजपा युती सरकारने करदात्यांचे कोट्यवधी रुपये खर्च केले. पण प्रत्यक्ष कामांची स्थिती अत्यंत भीषण आहे. नालेसफाई असो वा रस्ते काँक्रिटीकरणाची कामे यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी ACB मार्फत करा आणि दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

खासदार वर्षा गायकवाड यांनी आज चेंबूर येथील श्रमजीवी नगर, वत्सलाताई नाईक नगर आणि कुर्ला येथील क्रांती नगर, साबळे नगर परिसरातील महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

यावेळी खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकार व बीएमसीवर तोफ डागली, सत्ताधाऱ्यांनी नालेसफाईची कामं जोमात सुरू असल्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. अनेक भागांत नालेसफाईची कामं सुरूच झालेली नाहीत तसेच अन्य ठिकाणी गाळ, कचरा, राडारोडा अजूनही तसाच पडून आहे. त्यामुळे यंदाही मुसळधार पावसात अनेक भागांत पाणी साचण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या आणि महापालिकेच्या बेजबाबदार, भ्रष्ट कारभाराचा फटका पुन्हा एकदा सामान्य मुंबईकरांना बसणार आहे. सत्तेतील मंडळी भ्रष्टाचाराचा ‘मेवा’ खात बसली असून मुंबईकर माज्ञ यातना भोगत आहे हे अत्यंत संतापजनक आहे.

खा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, आजच्या पाहणीत नालेसफाईच्या कामांमध्ये दिरंगाई आणि अनेक त्रुटी आढळून आल्या, त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. या त्रुटी तत्काळ दुरुस्त कराव्यात, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू. ज्या भागांत नालेसफाई अद्याप झाली नाही, ती तत्काळ पूर्ण करावी तसेच अन्य मान्सूनपूर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. सत्ताधाऱ्यांनी आणि महापालिकेनं आपल्या कंत्राटदार मित्रांची गैरसोय होऊ नये म्हणून जनतेला वेठीस धरू नये. शासनाने आणि महापालिकेने मुंबईकरांच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशाराही गायकवाड यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *