नेते युरोपात, कार्यकर्ते कोमात!
नेते युरोपात, कार्यकर्ते कोमात!
अमरावती, दि .९ मे २०२५;
बाळासाहेब ठाकरे सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. त्याप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते लोकांच्या दारात काम करत आहेत. लोक काम करणाऱ्याला निवडून देतात, घरात बसणाऱ्याला नाही मात्र आता नेते युरोपात आणि कार्यकर्ते कोमात, अशी ठाकरे गटाची अवस्था झाल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
अमरावती येथे आयोजित शिवसेना पक्ष मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय राठोड, मंत्री संजय शिरसाट, मंत्री आशिष जैयस्वाल, कॅप्टन अभिजित अडसूळ आणि अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती संजय बंड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत धनंजय बंड, तालुकाप्रमुख सुनील डीके, गोपाळ लांजूरकर, सतीश काळे, अमोल पहिले, सागर बहुतकर, पंकज रेगे, योगेश गुंदे, गजानन पाटील, पिट्टू अनासने, सागर घोडे, तुकाराम चांदेकर, यांच्यासह ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, संजय बंड बाळासाहेबांचा कडवट कार्यकर्ता होता. अमरावतीत शिवसेना मोठी करण्यात संजयने जीवाचे रान केले. बाळासाहेब शिवसैनिकांना सवंगडी समजायचे. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथ कोणी मालक आणि नोकर नाही. सर्वांना काम करण्याची संधी आहे. जो काम करेल तो पुढे जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बंड म्हणजे उठाव, भगवत गीतेत श्रीकृष्णाने म्हटलंय जे स्वाभिमानी असतात ते बंड करतात, जेव्हा अन्याय झाला तेव्हा कसलाही विचार केला नाही. शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला आणि लोकांच्या मनातले सरकार आणले. सत्तेसाठी कुणासमोर तडजोड केली नाही. सत्ता येईल आणि जाईल पण नाव गेलं तर पुन्हा येत नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी खुर्चीसाठी हपापलेलो नाही. आपल्याला खुर्चीचा मोह नाही, मात्र ज्या लोकांनी खुर्चीत बसवले त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
