शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता.
शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता.
सांगली, दि. १२ एप्रिल :-
नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हरिदास बोंबले यांनी कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तर गव्हाचे बोगस बियाणे निघाल्याने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने रोटावेटर फिरवून उभे पिक जमीन दोस्त केले. महाराष्ट्रातील शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता. ही काय परिस्थिती निर्माण केली आहे? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हे मत व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले की, शेती साहित्य खरेदी करताना शेतकऱ्याला महागाईची झळ बसते, त्याला जीएसटीचा भुर्दंड भरावा लागतो. खताच्या किमती गगनाला भिडल्या आहेत असे ते म्हणाले. कर्जमाफी तर फक्त सत्ताधाऱ्यांच्या शब्दाची वाफ आहे हे शेतकऱ्याने ओळखले आहे. सततचा दुष्काळ, अवकाळी पाऊस ह्याने तर शेतकरी पिचला आहेच, पण सरकारच्या असंवेदनशीलतेने त्याला हतबल बनवले आहे. हे चित्र अत्यंत करुण आहे. आपल्या अन्नदात्याच्या घामाचे मोल काय? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
एकाबाजूला श्रीमंत धनदांडग्या लोकांसाठी सरकार खैरात वाटत सुटले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी कुटुंब १ – २ लाखांच्या कर्जपायी घरचा आधार गमावत आहेत. शेतकरी स्व. हरिदास बोंबले यांच्या कुटुंबाला न्याय मिळायलाच पाहिजे तसेच सरकारने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर तत्काळ फौजदारी खटला दाखल केला पाहिजे. शेतकऱ्याला नुकसानीचा परतावा कंपनीकडून मिळाला पाहिजे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
