‘त्या’ प्रवृत्तीने पुन्हा डोके वर काढले!
‘त्या’ प्रवृत्तीने पुन्हा डोके वर काढले!
पुणे, दि. १२ एप्रिल;
क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा व वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. परंतु फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा लागू करण्याचा डाव आहे. संविधानातील समता, बंधुता व सामाजिक न्याय या मुल्ल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त फुलेवाड्यात जाऊन अभिवादन केले त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, फुले दाम्पत्याने मुलींची पहिला शाळा काढली त्यावेळी सावित्रीबाई फुलेंवर दगड फेकणारे, शेण फेकणारे विदेशातून आले नव्हते, महिला शिकली तर धर्म बुडेल या विचाराच्या लोकांनीच त्यांना छळले. आता फुले चित्रपटातून तो भाग वगळावा असे सेन्सॉर बोर्ड सांगत आहे, ही लपवाछपवी कशासाठी? मंत्री चंद्रकांत पाटील आज फुले वाड्यावर बोलताना म्हणाले की पूर्वी तसे होत होते पण आता होत नाही. संविधानामुळे ते होत नाही. पण चंद्रकांत पाटील यांच्या पक्षाला हे मान्य आहे का? भाजपासाठी गोळवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट’ हे बायबल आहे, त्यात महिला शिक्षणाला थारा नाही.चातुर्वर्ण्याबरोबर पाचवा वर्ण महिला सांगितलेला असून महिलांना अति शुद्र म्हटले आहे ते चंद्रकांत पाटील यांना मान्य आहे का? असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.
यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत पुणे शहर जिल्हा अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दिप्ती चौधरी, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय ठाकरे, प्रदेश प्रवक्ते गोपाल तिवारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
