एसटीचे जाहिरातीचे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवा.
एसटीचे जाहिरातीचे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवा.
मुंबई, दि. ४ एप्रिल –
एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्यामाध्यमातून मिळणारे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. परिवहन आयुक्तालय येथे राज्य परिवहन महामंडळाची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
सध्या ज्या जाहिरात संस्थाना काम दिले आहे, त्यांच्याकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांचे करार रद्द करावेत. अशा सूचना देऊन मंत्री सरनाईक म्हणाले की, यासाठी चांगले उत्पन्न देणाऱ्या संस्थांची निवड करावी. सध्या जाहिरातीच्या माध्यमतून महामंडळाला 22-24 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामध्ये वाढ करुन हे उत्पन्न 100 कोटी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.
नवीन बस खरेदीमध्ये प्रवासी व बस यांची सुरक्षा लक्षात घेऊन जाहिरातीसाठी उपयुक्त पॅनेल बसवण्याची व्यवस्था करावी. तसेच जुन्या बसेसमध्येही याची व्यवस्था करण्यात यावी. बसस्थानके सुधारण्यासाठी नियोजन करावे.
एसटीला डिझेल पुरवठा करण्याऱ्या संस्थांकडून सीएसआर फंडाच्या माध्यमतून राज्यातील महत्त्वाच्या बसस्थानकांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष उभारून ते चांगल्या स्थितीत राहतील याची व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या. यासंदर्भात मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळ मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करते. यासाठीच्या भविष्यात निविदा काढताना त्यामध्ये सीएसआर फंड संबंधित संस्थेने एसटी साठी खर्च करावा, अशी अट समाविष्ट करावी.
