वक्फ बोर्ड विधेयकाबाबत ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका.
वक्फ बोर्ड विधेयकाबाबत ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका.
मुंबई, दि. ३ एप्रिल २०२५;
निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे आज वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने समोर आले, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली. बाळासाहेबांचे विचार सोडून राहुल गांधी यांच्या सांगण्यानुसार वागणाऱ्या उबाठाची दुटप्पी भूमिका दिसली, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सोयीचे राजकारण करणारे लोक वक्फ बोर्ड विधेयकाचा हिंदुत्वाशी संबध नाही, असं जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो. आता ते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातात की राहुल गांधी सांगतात ते करतात, हे पाहावे लागेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासंदर्भात शिवसेनेने यापूर्वीच स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेतली आहे. आम्ही कधीही मतांसाठी सोयीचे राजकारण केले नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांसोबत आम्ही पुढे जात आहोत. आम्ही सत्तेसाठी विचारांशी कधीही तडजोड केली नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
काही मुठभर लोकांच्या हातात वक्फ बोर्डाची मालमत्ता ठेवण्यापेक्षा गरिब मुसलमानांसाठी शाळा, रुग्णालये झाली पाहिजेत. हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या विधेयकामुळे मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला होईल. या विधेयकाचे मुस्लिम समाजानेही स्वागत करायला हवे. या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील छत्रपतींच्या आदर्शावर देशाचे नेतृत्व करत आहेत. इथ औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना थारा नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
