युवक काँग्रेसचा आक्रोश मोर्चा पोलीसांनी अडवला.
युवक काँग्रेसचा आक्रोश मोर्चा पोलीसांनी अडवला.
मुंबई, दि. २० मार्च ;
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने १५ मार्च ते १९ मार्च असा पुणे ते मुंबईतील विधान भवन, युवा आक्रोश यात्रा आयोजीत केली होती. आज ही यात्रा मुंबईत धडकली व आझाद मैदनाजवळच्या मुंबई काँग्रेस कार्यालयापासून विधान भवनवर धडक मोर्चा आयोजित केला होता. पोलिसांनी आधी या मोर्चाला परवानगी दिली होती पण नंतर सरकारच्या दबावामुळे या धडक मोर्चाला परवानगी नाकारली. मुंबई काँग्रेस कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने तरुण या मोर्चात सहभागी होण्यासाठी जमा झाले होते पण पोलिसांनी ऑफीस परिसराला बेरिकेड्स लावून बंद केले व मोर्चातील कार्यकर्त्यांची धरपकड केली.
यावेळी तरुणांना मार्गदर्शन करताना उदय भानू म्हणाले की, देशात बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत ज्वलंत असून ५० वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी सध्या आहे. भाजपा सरकार तरुणांच्या हाताला काम देत नाही. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली. आत्ता महाराष्ट्रातील सरकारनेही निवडणुकीत तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते पण १५ लाख रुपयांच्या चुनावी जुमल्याप्रमाणे हे आश्वासनही फसवेच ठरले असल्याचे उदय भानू म्हणाले.
“महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून सरकारी रिक्त पदांची भरती केली जात नाही. स्पर्धा परिक्षांमध्ये पेपर फुटी होते, यातून तरुणांचे नुकसान होत आहे. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना सरकारने मात्र तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचा तरुण शांत बसणार नाही, यापुढेही तरुणांच्या प्रश्नांवर भाजपा युती सरकारला जागे करण्याचे काम करु”, असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते मुंबई विधानभवनाकडे ‘युवा आक्रोश’ यात्रेचा पाचव्या दिवशी हजारो युवकांच्या उपस्थितीत विधानभवनाला घेरावच्या दिशेने कुणाल राऊत सोबत युवक काँग्रेसच्या कार्यकत्यांना अटक करण्यात आले.
महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, सामाजिक शांतता आणि सौहार्द यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सरकारला जाग आणण्यासाठी आयोजित ही आक्रोश पदयात्रा करण्यात आली होती. बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणांना न्याय मिळावा, महिलांना सुरक्षित वाटावे, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन मिळावे, तसेच राज्यात सामाजिक एकता आणि शांततेसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, या प्रमुख मागण्यांसाठी युवक काँग्रेसने ही पदयात्रा सुरू केली होती. पोलिसांनी ही यात्रा थांबवून युवक काँग्रेसच्या कार्यकत्यांना अटक केली.
या प्रसंगी महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल राऊत, प्रभारी अजय चिकारा, बंटी शेळके, अखिलेश यादव, निगम भंडारी, अजित सिंह, एहसान खान, वैष्णवी किराड, शिवराज मोरे, प्रशांत ओगले, श्रीनिवास नालमवार, महेश देशमुख, राहुल पाटील, स्वप्नील पाटील, अकबर जहागीरदार, ऋत्विक धनवट, अमोल दौंडकर, अतुल पेडेवाड आदी उपस्थित होते.
