औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार सारखाच.
औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार सारखाच.
बीड, दि. १० मार्च ;
औरंगजेबाने वडिलाला कैद करून, भावाचा खून करून राज्य मिळवले. देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाला आणि कायदा सुव्यवस्थेला कैद करून ठेवले आहे. औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार सारखाच आहे. असा ह्ल्लाबोल करत संतोष देशमुख भाजपाचा कार्यकर्ता होता, त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली पण भाजपाचे प्रांताध्यक्ष देशमुख यांच्या घरी गेले नाहीत. पण विरोधी पक्षाचा प्रांताध्यक्ष जाऊन भेटतो हा भाजपा व काँग्रेसच्या विचारातील फरक आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
मस्साजोमधून निघालेली सद्भावना पदयात्रा दोन दिवस व ५१ किलोमीटरचा प्रवास करून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सद्भावना मेळाव्याने सांगता झाली.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, बीड जिल्हा आज सुरक्षित नाही तर उद्या शेजारचे जिल्हेही सुरक्षित राहू शकणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. भाजपाने राज्यात द्वेष पसरवण्याचे काम केले त्याला सद्भवानेने उत्तर द्यावे लागणार आहे. आधी ‘पन्नास खोके, एकमद ओके’ असे होते, पुन्हा ‘बोल मेरे आका’, आले आणि आता ‘खोक्या’ समोर आला आहे. फडणवीस गृहमंत्री आहेत पण ते बीड प्रकरणावर बोलत नाहीत, दुसऱ्याला पुढे करतात. राजीनामा हा धनंजय मुंडे यांचा घेतला पण खरे पाहता संतोष देशमुख हत्येप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचाच राजीनामा झाला पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची वाईट अवस्था पाहिली असता घाशीराम कोतवाल हाच महाराष्ट्राचा कारभार चालवत आहे, असे सपकाळ म्हणाले.
बीड जिल्ह्यातील सद्भावना यात्रा संपली असली तरी हा आगाज सुरुच राहणार आहे. लवकरच परभणीमध्ये शिव- भीम यात्रा काढली जाणार आहे. राज्यात सामाजिक तेढ वाढत आहे. त्याला छेद देण्यासाठी सद्भावना वाढीसाठी प्रयत्न केला जाणार आहे आणि आज महाराष्ट्राचे जे चित्र आहे बदलायचे आहे, असे काँग्रेस प्रांताध्यक्ष म्हणाले.
सद्भावना पदयात्रेचा संदेश हा जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे हा होता. हा संदेश सर्वापर्यंत पोहोचवून आपल्याला सद्भावना वाढवायची आहे. पांडुरंगाच्या वारीच्या निमित्ताने सर्व बहुजन एकत्र आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून अत्याचा-यांविरोधात लढले. आताही सर्वांना मिळून अत्याचा-यांविरोधात लढायचे आहे. महात्मा गांधीचा काँग्रेसचा विचार पुढे घेऊन जायचा आहे. मी सद्भावना यात्रा सुरु केल्यावर माझ्यावर टीका सुरु झाली. सामाजिक विभाजनाच्या विरोधात उभे राहिल्यामुळे माझ्यावर टीका सुरु केली जात आहे. ट्रोल केले जाईल, धमक्याही दिल्या जातील, खरेदी करण्याचा प्रयत्नही केला जाईल, अडथळे आणले जातील पण या सर्वांवर मात करून आम्ही सामाजिक एकोपा जपू, सद्भावना वाढवू आणि राजकीय फायद्यासाठी तणाव निर्माण करणा-यांविरोधात लढू, हा काँग्रेसचा विचार आहे, आम्ही तो जपू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
