इंग्रजी आवश्यक पण मराठी आग्रहाने बोला!
इंग्रजी आवश्यक पण मराठी आग्रहाने बोला!
मुंबई, दि. २८ फेब्रु
संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांची मराठी हा अस्सल हिरा असून या हिऱ्याचे जतन केले तर संस्कृती टिकेल. काळानुरूप इंग्रजी भाषा शिकणे आवश्यक झाले असून सर्वच प्रदेशातील पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवत आहेत. मात्र प्रत्येक मराठी कुटुंबाने आपल्या घरी आग्रहाने मराठी भाषा बोलली पाहिजे, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून राजभवन येथे मराठी अभिवाचन, काव्यवाचन व गायनाचा ‘माय लेकरं’ हा कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्यात आला असून अनेक विद्यापीठांमध्ये आज पुस्तकांचे मराठी भाषांतर केले जात आहे. आज भाषिक लिखाणाचा लोकांना सराव राहिला नसून प्रत्येकाने घरी किमान एक मराठी वृत्तपत्र घेऊन वाचले पाहिजे व लिखाणाचा देखील सराव केला पाहिजे. पालकांनी मुलांना दिवसातून किमान एक पान तरी मराठी वाचण्यास प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आपण राज्यपाल पदावर असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे आपले भाग्य आहे असे सांगून आपल्याजवळ हिरा आहे ही ज्याला जाणीव नाही तो त्याचा पेपरवेट म्हणून उपयोग करतो तसे भाषेच्या बाबतीत होऊ नये असे राज्यपालांनी सांगितले. जीवनात आई मुलाचे नाते विलक्षण असून राजमाता जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते असे राज्यपालांनी सांगितले.
महाराष्ट्र व तामिळनाडूच्या सांस्कृतिक संबंधाबाबत बोलताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तामिळनाडू अभियानाची आठवण केली. शिवाजी महाराजांनी तामिळनाडूतील जिंजी किल्ला जिंकला होता तसेच वेल्लोरचा देखील त्यांचा संबंध होता असे सांगून शिवाजी महाराजांच्या काळात तंजावर येथे व्यंकोजी राजे व पुढे सरफोजी राजे भोसले यांचे राज्य होते असे त्यांनी सांगितले. तंजावर येथे भोसले घराण्याने केवळ मराठी भाषा व संस्कृतीचे जतन केले असे नाही तर त्यांनी तेथील भव्य अश्या सरस्वती महाल ग्रंथालयात दुर्मिळ तामिळ साहित्याचे देखील जतन केले असे राज्यपालांनी सांगितले.
पुणे येथील ‘कलागंण’ या संस्थेच्या वतीने ‘माय लेकरं’ हा आई आणि मूल यांच्या नात्याचा गोफ उलगडणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ अरुणा ढेरे यांची संकल्पना व संहिता असलेल्या या कार्यक्रमात डॉ गिरीश ओक व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या अभिवाचनानें तर कलांगणच्या संस्थापिका गायिका चैत्राली अभ्यंकर यांनी आपल्या सुरेल काव्यवाचनाने राज्यपालांसह उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी यांच्यापासून अनेक नव्या जुन्या लेखक कवींच्या आई व मूल नात्यांसंबंधी उताऱ्यांचे व कवितांचे भाववाचन करण्यात आले.
