स्वयंपुनर्विकासात खोडा घातला तर नोकरी जाईल!
स्वयंपुनर्विकासात खोडा घातला तर नोकरी जाईल!
मुंबई, दि. २६ फेब्रुवारी –
स्वयंपुनर्विकासाचे १६०० प्रस्ताव प्राप्त झाले असताना म्हाडाने ४२ प्रस्तावांनाच मंजुरी दिली. स्वयंपुनर्विकासात कुणी खोडा घालायचा प्रयत्न केला तर त्याला नोकरी वाचविता येणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच सरकारी यंत्रणा उत्तरदायी रहावी, यासाठी स्वयंपुनर्विकासाबाबत असलेल्या सर्व सेवांचा समावेश राईट टू सर्व्हिसेस ऍक्टमध्ये करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
चारकोप येथील स्वयंपुनर्विकसित झालेल्या श्वेतांबरा को. ऑप. हौसिंग सोसायटीचे उदघाटन आणि चावी वाटप सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, म्हाडाच्या जागेवरील स्वयंपुनर्विकासाच्या बाबतीत प्रीमियम भरण्यास यापूर्वीच ३ वर्षांची मुदत दिली होती, त्यावर साडे आठ टक्के व्याज लावले जात होते. आता पहिल्या ३ वर्षांसाठी हे व्याज माफ करू. एनसीडीसीकडून पतपुरवठा झाला पाहिजे, परंतु, शहरी भागातील गृहनिर्माणासाठी याचा वापर करता येत नाही, हे दरेकर यांनी लक्षात आणून दिले आहे, त्यांची मागणी योग्य आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आणि मी आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची येत्या काही दिवसात भेट घेऊ. ते यात लक्ष घालून नक्कीच अट काढून टाकतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले कि, आजचा दिवस एकप्रकारे स्वप्नपूर्तीचा आहे. श्वेतांबरीचे उदघाटन केल्यानंतर आणि नव्याने निर्माण झालेले फ्लॅट बघितल्या नंतर स्वयंपुनर्विकासाची जादू काय असते हे दिसून आले. स्वयंपुनर्विकासातून उभी राहिलेली ही १५ वी इमारत आहे. प्रविण दरेकर व मुंबई बँक यांच्यामुळे स्वयंपुनर्विकास मोहिमेला चालना मिळाली. त्यादृष्टीने स्वयंपुनर्विकासाचे शिल्पकार प्रविण दरेकर हेच आहेत. स्वयंपुनर्विकासाचा प्रवास प्रवीण दरेकर यांच्या पाठपुराव्यामुळे २०१८ साली सुरू झाला आणि आम्ही शासन निर्णय काढला. दुर्दैवाने २०१९ नंतर आपले सरकार नसल्यामुळे स्वयंपुनर्विकासाला ब्रेक लागला. आता वेगाने हे काम सुरूच झाले असून गोरेगाव येथिल गृहनिर्माण परिषदेत केलेल्या १८ मागण्यापैकी १६ मागण्यांचे जीआर आम्ही काढले, अशीही माहिती त्यांनी दिली.
