‘माझा जन्म जैविक नाही’,म्हणणाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा?
‘माझा जन्म जैविक नाही’,म्हणणाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा?
नवी दिल्ली, दि. २२ फेब्रुवारी २५:
अखिल भारतीय साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या भाषण अत्यंत रोखठोक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता, आजही एखादा व्यक्ती माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणतो त्यांच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न करत संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी विचारला आहे.
दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तुफान टोलेबाजी केली, त्या म्हणाल्या, ‘आज फार काही बोलायचे नाही, असा मला दम भरला आहे,’ असे म्हणत ‘पंतप्रधानांना विठ्ठल-रखुमाईची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विठ्ठल-रखुमाई हे आमच्या महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचे प्रतीक आहेत. भाषा ही जैविक असते, प्रवाही असते. बोलली गेली, तर ती जिवंत राहते व महाराष्ट्रात संतांनी ही मराठी जिवंतच ठेवली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठीही त्यांनी भूमी निर्माण केली. ज्या दिवशी आईने बाळासाठी पहिली ओवी म्हटली, त्या दिवशी मराठी निर्माण झाली,’ असे त्या म्हणाल्या.
संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की, आजच्या स्त्री मुक्तीच्या विचारांना मागे सारतील अशाप्रकारचे विचार संत स्त्रियांनी त्यांच्या साहित्यातून मांडल्या आहेत. त्यांची विचारशक्ती, प्रतिभाशक्ती आणि संवेदनशीलता, भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व या सगळ्या किती मोठ्या गोष्टी आहेत.प्रतिभा ही महिलांमध्ये उपजत आहे आणि ती अनुभवातून परिपक्व झालेली आहे. अशा शब्दात संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी खंत व्यक्त केली.
संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी स्त्री असण्यापेक्षा गुणवत्त हा महत्वाचा आधार आहे. दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र विचारातून, साहित्यातून जीवंत राहिला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रेमाचा संदेश दिला जावा, अशी अपेक्षा संमेलनाध्यक्ष डॉ.तारा भवाळकर यांनी व्यक्त केली.
