मराठीशाहीने अटकेपार झेंडा फडकवल्याचा सार्थ अभिमान!

0
शरद पवार

मराठीशाहीने अटकेपार झेंडा फडकवल्याचा सार्थ अभिमान!

दिल्ली, दि. २२ फेब्रुवारी:

दिल्ली आणि महाराष्ट्राचे एक नाते आहे. ११ व्या शतकामध्ये अनंगपाल तोमर यांनी दिल्लीची स्थापना केली तेव्हापासून महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय व सांस्कृतिक संबंध निर्माण झाले आहेत. १६६६ साली औरंगजेबाने त्याचा वाढदिवस आग्र्याला साजरा केला होता तो जर दिल्लीमध्ये केला असता तर शिवछत्रपतींचा स्वाभिमानी साक्षात्कार इथेच घडला असता. पण त्या घटनेपासून प्रेरणा घेऊन मराठीशाहीने आपला झेंडा हा अटकेपार फडकवला. याचा मराठी भाषिकांना सार्थ अभिमान आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे.

नवी दिल्लीत आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नात्याने केलेल्या भाषणात शरद पवार पुढे म्हणाले की,प्रधानमंत्री चौधरी चरणसिंह मला भेटल्यानंतर नेहमी सांगायचे की तुम्ही लोकांनी एक गोष्ट काही ठीक केली नाही. मराठे आले, दिल्लीपर्यंत पोहोचले. दिल्ली जिंकली आणि दिल्लीवर ताबा कायमचा आपल्या हातात ठेवण्या ऐवजी पानिपतला गेले. जाण्याची काही आवश्यकता नव्हती, वेगळा इतिहास घडला असता पण झालं ते झालं. तो इतिहास हा आपण काही विसरू शकत नाही.

मराठी लेखणीने साहित्य क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिले आहे, त्याची नोंद देश पातळीवरसुद्धा घेतली गेली. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या सर्व मराठी लेखकांना आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. त्याद्वारे मराठी भाषेची पताका ही देशभरात फडकत राहिली. विजय तेंडुलकर यांनी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता लेखन केले. घाशीराम कोतवाल, सखाराम बायंडर अशा नाटकांमुळे काहीवेळा त्यांना रोषाला सुद्धा सामोरे जावे लागले पण ते आपल्या भूमिकेपासून हटले नाहीत. नामदेव ढसाळ, कवी यशवंत मनोहर, नारायण सुर्वे यांच्यासारख्या कवींनी सर्वसामान्यांचा विचार हा सातत्याने मांडला. अण्णाभाऊ साठे यांनी गाव कुटुंबाचं, उपेक्षितांचं जगणं मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या साहित्याचा डंका रशियापर्यंत पोहोचला.

साहित्याच्या क्षेत्रामध्ये अनेक भगिनींनीसुद्धा फार मोठी भर घातली. ती नुसती संख्यात्मक नाही तर गुणात्मक सुद्धा आहे. महानुभाव पंथातील महदंबा, मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. सावित्रीबाई फुले नंतरच्या काळामध्ये शांता शेळके, इंदिरा संत, अरुणा ढेरे यांनी मराठी साहित्याला सशक्त करण्याचे काम केले. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्त्रियांना अधिकाधिक मिळाले तर ही परंपरा अधिक बलवान झाल्याशिवाय राहणार नाही.

सारस्वत साहित्य संमेलन म्हटल्यानंतर महाराष्ट्रात एका गोष्टीची चर्चा सुरू होते. राजकारण्यांचा इथे काय संबंध? त्या संबंधाचे लिखाण हे गेले काही दिवस चालतं. यंदा काय अजून झालेलं नाही. खरं म्हटलं तर राजकीय नेते आणि संमेलन यांचाही काही संबंध आहे. राजकीय नेत्यांनी संमेलन मंचावर येता काम नये यासंबंधीचा वाद दरवर्षी कशाला करायचा? राजकारण आणि साहित्य यांच्यातील परस्पर प्रवाह हा दुतर्फा आहे.बाळ गंगाधर टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, अटल बिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण या लोकांनी सगळ्या क्षेत्राला प्रतिष्ठा दिली. कलेला राजाश्रय लाभला तसंच राजांनीही साहित्य-कला जोपासली. बुधभूषणकार छत्रपती संभाजी महाराज हे त्याचे बोलके उदाहरण आहे.राजकारण आणि साहित्याची फारकत होऊच शकत नाही, ते परस्परांना पूरक होऊ शकते असे विचार शरद पवार यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *