भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित करा.
भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित करा..
नवी दिल्ली दि. २२ फेब्रिवारी :
भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहे. भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता, येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित करणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. साहित्य संमेलनासाठी आलेल्या सर्वांचे मराठीत स्वागत करून प्रतंप्रधान म्हणाले, मराठी साहित्य संमेलन एका भाषेपुरते मर्यादित नाही, त्यास स्वातंत्र्य संग्रामाचा गंध असून तो एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे.1878 पासून देशातील अनेक महान व्यक्तींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. या परंपरेशी जोडेले जाण्याचा मला विशेष आनंद आहे. जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून होत असलेले संमेलनाचे आयोजन प्रशंसनीय आहे. ज्ञानेश्वरांनी ‘माझ्या मराठाचि बोलू कौतुके, अमृताते पैजा जिंके’ असे म्हटले आहे. मराठी भाषेवर माझे खूप प्रेम आहे. मराठी भाषा शिकण्याचे प्रयत्न मी निरंतर करीत आहे. अशा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पूर्ण करण्याची संधी मिळाल्याचे मला मोठे समाधान आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वे जयंती वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केल्याच्या पार्श्वभुमीवर हे संमेलन होत आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. वेदापासून विवेकानंदांपर्यंत नव्या पिढीला पोहोचविण्याचा संस्कारयज्ञ या माध्यमातून चालविला जात आहे. संघाच्या माध्यमातून मराठी भाषा आणि परंपरेशी जोडले जाण्याची मला संधी मिळाली. मराठी एक परिपूर्ण भाषा असल्याचे स्पष्ट करताना प्रधानमंत्री म्हणाले, मराठीत शुरतेसोबतच वीरता देखील आहे, सौंदर्य आणि संवेदना दोन्ही आहेत, समानता आणि समरसता आहे, मराठीत अध्यात्म आणि आधुनिकताही आहे. शक्ती, भक्ती आणि युक्तीदेखील आहे. देशाला आध्यात्मिक ऊर्जेची गरज असतांना महाराष्ट्राच्या थोर संतांनी ऋषींचे ज्ञान मराठीत जनतेसमोर ठेवले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास, संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, गोरा कुंभार आदी अनेक संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. आधुनिक युगात ग.दि. माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने समाजावर प्रभाव टाकला आहे.
गुलामीच्या शेकडो वर्षाच्या कालखंडात मराठी भाषा आक्रमणकर्त्यांपासून मुक्तीचा जयघोष बनली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांसारख्या वीरांनी शत्रूंना मागे सारले. स्वातंत्र्य संग्रामात वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, वीर सावरकरांनी इंग्रजांची झोप उडवली. मराठी साहित्याने देशप्रेमाची धारा प्रवाहीत झाली. या साहित्याने देशप्रेमाचा जागर केला, जनतेला नवी ऊर्जा दिली. अशा शब्दात मराठीची महती व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले, मराठी साहित्याने समाजातील वंचित, शोषितांसाठी मुक्तीचे दरवाजे खुले करण्याचे कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षि कर्वे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक मराठी समाजसुधारकांनी नवा विचार देण्यचे कार्य केले. मराठी भाषेने समृद्ध दलित साहित्य देण्याचे कार्य केले. मराठी भाषेने प्राचीन विचारांसोबत विज्ञानही मांडले. महाराष्ट्राने प्रागतिक विचार स्विकारले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे, मुंबईने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला पुढे नेले.
देशाची भाषिक विविधता आपल्या एकतेचा मजबूत आधार असून मराठी याचे उत्तम उदाहरण आहे. भाषा एखाद्या आईप्रमाणे मुलांना नवा विचार देते, विकासाशी जोडते, भेद करीत नाही. भाषेने माणूसकीच्या विचारांना अधिक व्यापक केले आहे.मराठीने इतर भाषेतून साहित्य स्विकारले आणि त्या भाषांनाही समृद्ध केले. अनेक चांगल्या रचनांचे मराठीत भाषांतर झाले आणि मराठीतील उत्तम साहित्याचे इतर भाषात भाषांतर झाले. भाषांनी स्वत: सोबत इतरांना समृद्ध केले. हा समरसतेचा प्रवाह आणखी पुढे नेण्याची गरज आहे.
मराठीसोबत सर्व प्रमुख भाषेतून उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील युवक आता मातृभाषेतून उच्च शिक्षण घेवू शिकेल. साहित्य समाजाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्य संमेलन, साहित्यिक संस्थांची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे. मराठीतीत महान विभूतींनी स्थापन केलेले आदर्श आणखी पुढे नेण्याचे कार्य महामंडळ करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजमाध्यमांद्वारे मराठी साहित्यात योगदान देणाऱ्या युवकांना प्रोत्साहन द्यावे, युवकांच्या स्पर्धांचे आयोजन करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
