बीडमधील गुंडगिरी थांबली पाहिजे!

0
20250220_112117

बीडमधील गुंडगिरी थांबली पाहिजे!

बीड, दि.२० फेब्रुवारी;

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोग येथे दिवंगत सरपंच संतोष देशमुख आणि परळी येथील दिवंगत महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते.

सुप्रिया सुळे यांच्याशी बोलताना देशमुख कुटुंबीयांना आणि मुंडे कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.आता हा लढा मी लढणार असून, देशमुख आणि मुंडे कुटुंबीयांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी देशमुख आणि मुंडे कुटुंबीयांसह ग्रामस्थांना दिले आहे.

खंडणी मागणे गुन्हा आहे, वाल्मीक कराड खंडणी मागत होता, तर त्याला आधी अटक का झाली नाही? त्यांना ईडी का नाही लागली? याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल. मे महिन्यात पहिल्यांदा खंडणी मागितली, तेव्हाच त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची कारवाई व्हायला पाहिजे होती. बीड जिल्ह्यात लोकांना वर्दीची भीतीच राहिली नाही. बीडची बदनामी करायचे पाप या पाच दहा लोकांनी केले आहे. तुम्ही सगळे सुसंस्कृत आणि चांगलेच आहात. तुम्ही सुसंस्कृत असल्यामुळेच ते तुम्हाला दम देतात. आता महिलांनी लढाई हातात घेतली पाहिजे, समोर कोणी आले तर घ्या हातात लाटणे आणि ठोकून काढा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

संतोष देशमुख प्रकरणात आम्हाला एक दिवस अपडेट पाहिजे, अशी मी मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती करणार आहे. तुमचे प्रशासन काय काम करतंय याची माहिती मिळाली पाहिजे. लपवण्यासारखे काही नाही, तर मग तुम्ही राज्याला का सांगत नाहीत? वाल्मीक कराडची व्हिडिओ काढून मी पोलिस स्टेशनला येतोय, असे सांगण्याची हिंमत कशी होते? कुणाच्या जीवावर ही मस्ती आहे. कृष्णा आंधळे आहे कुठे? असा हवेत गायब झाला का? रोज आमचे फोन ट्रॅक करता, तर तो कृष्णा आंधळेला ट्रॅक करता येत नाही का? असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारला केला. कृष्णा आंधळे आणि सर्व आरोपींचा सीडीआर मिळालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

बीडमधील यांची सत्तेची आणि पैशांची मस्ती उतरलीच पाहिजे. सत्ता आणि पैसा आयुष्यभर टिकत नाही. हा लढा सत्यानेच लढूया. आपण सगळे जोपर्यंत एकत्र आहोत, ताकदीने लढू. कोर्ट केसेस वगैरे सर्व मी स्वतः बघेल. तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. काही दिवसांपूर्वी एकाचे डोके फोडले त्यालाही आपण न्याय मिळवून देऊ. बीडमधील गुंडगिरी कुठेतरी थांबली पाहिजे, ग्रामस्थांनी आंदोलन करू नये, तुमची लढाई आम्ही लढणार, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थांना केले.

बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणी संसदेतही आवाज उठवला होता. बजरंग सोनावणे आणि मी आठ दिवसांपूर्वी अमित शाह यांना भेटून आलो. त्यांनी आम्हाला शब्द दिलाय, ते या विषयात जातीने लक्ष घालतील. आम्ही दोघांनी याचे फोटो टाकले नाहीत, काही बोललो नाही. आम्ही लोकशाही पद्धतीने गृहमंत्र्यांना विनंती केली. यामध्ये पोलीस किंवा अधिकारी कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय करु नका. मी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला शब्द देते, मी कोणाला भेटणार नाही, तडजोड करणार नाही. जो कोणी याच्यामागे आहे, त्याला फाशी झाली पाहिजे. महाराष्ट्राने तुम्हाला इतके मोठे मतदान केलंय, न्याय मिळणार नसेल तर काय करायची सत्ता, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस हे एक सुसंस्कृत नेतृत्व आहे. देशमुख कुटुंब जेव्हा त्यांच्याशी बोलले असेल, तेव्हा तुम्हाला आठ दिवसांतच न्याय मिळेल, अशी माझीही अपेक्षा होती. राजकारण तर सुरूच राहील, हे राज्य आता मी चालवतो आणि राज्यात असली कुठलीही कृती सहन करणार नाही, असा एक संदेश द्यायला पाहिजे होता. मी आज खासदार म्हणून नाही, तर महाराष्ट्रातील महिला म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. माझा पदर पुढे करून या भावासाठी न्याय मागणार आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे यांनी परळी येथे महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी यांनी आपबीती कथन करून न्याय मिळत नाही. माझ्या पतीचा कोणसोबत वाद नव्हता, त्यांची हत्या का झाली? कोणी केली? याची काहीच माहिती पोलिस देत नाहीत. आता १५ महिन्यांच्या नंतरही तपासात काहीच हाती लागले नसल्याची खंत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी बीडचे पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांना फोनवरून संपर्क केला. मुंडे यांच्या हत्येच्या तपासातील प्रगती जाणून घेत सुप्रिया सुळे यांनी पोलिस अधीक्षक कॉवत यांच्याकडे लवकरात लवकर आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली. तसेच तपासात काय प्रगती झाली याची माहिती मुंडे कुटुंबांना वेळोवेळी देण्यात यावी असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *