नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी करा..

0
IMG-20250214-WA0124

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी करा..

नाशिक, दि. १५ फेब्रुवारी :

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होईल, असे नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते, साधूग्रामच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, कुंभमेळा व अन्य अनुषंगिक विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कुंभमेळ्यासाठीच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानुसार देशभरातून होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करताना रस्त्यांचा आवश्यक तेथे विस्तार करावा. गोदावरी नदी पात्रात स्वच्छता राहील याची दक्षता घेताना जल प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मल:निस्सारण, जलशुद्धीकरणाचे प्रस्ताव तातडीने राज्य शासनाला सादर करावेत. त्यासाठी आवश्यक निधीच्या तरतुदीसाठी प्रयत्न केले जातील. कुंभमेळा कालावधीत होणारी भाविकांची गर्दी पाहता सीसीटीव्ही, ध्वनिक्षेपक यंत्रणेचे बळकटीकरण करावे. त्यासाठी नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांनी समन्वयाने नियोजन करावे.

प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करून तेथे केलेल्या उपाययोजनांची माहिती करून घ्यावी. जेणेकरून त्याचा कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी उपयोग होऊ शकेल. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रामकालपथ, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मोनोरेलचाही आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *