… त्यावेळी शिवसैनिकांची परवानगी घेतली होती का?

0
images (96)

… त्यावेळी शिवसैनिकांची परवानगी घेतली होती का?

मुंबई, दि. १४ फेब्रुवारी-

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, अशा सुचना आदित्य ठाकरेंनी खासदारांना केल्या. यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावत मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलात त्यावेळी शिवसैनिकांची परवानगी घेतली होती का ? असा खडा सवाल उपस्थित केला आहे.

 

पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडीवर भाष्य केले. राजन साळवी यांच्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशावर बोलताना ते म्हणाले कि, उद्धव ठाकरेंना रोज धक्के बसताहेत किंबहुना एकनाथ शिंदेनी दिलेल्या धक्क्यानंतर सावरणे अपेक्षित होते. परंतु बाळासाहेबांचा विचार पुन्हा स्वीकारणे यापेक्षा पवार आणि काँग्रेसची तळी उचलण्यात त्यांना धन्यता वाटली. पक्षाला, नेत्यांना जी ताकद द्यायला लागते ती दुर्दैवाने उद्धव ठाकरे देऊ शकतं नाही अशी हतबलता कार्यकर्ते आणि नेत्यांत येतेय. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे नेऊ शकतात, शिवसेना वाढवू शकतात आणि कार्यकर्ते, नेत्यांना ताकद देऊ शकतात म्हणून कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदेंना स्वीकारताना दिसताहेत. तसेच त्यांना तोही पर्याय वाटत नसेल असे नेते, कार्यकर्ते भाजपातही मोठ्या प्रमाणावर येताहेत.

 

ही सुरुवात आहे. अनेक आमदार, खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. स्नेहभोजनाचे रूपांतर पक्षप्रवेशात होऊ शकते. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री यांना भेटायला गेले त्यावेळी शिवसैनिकांची त्यांनी परवानगी घेतली होती का ? एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे खासदार त्यांना भेटायला जाऊ शकतात. विरोधी पक्षात असलो तरी एकमेकांना भेटणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. परवानग्या घेत बसलात तर एकही माणूस आपल्याकडे राहणार नाही. त्यांनी दमाने घ्यावे, असा टोलाही दरेकरांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कारावेळी ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते यावर बोलताना दरेकर म्हणाले कि, चर्चा होत असतात. तो कार्यक्रम साहित्य संमेलनाचा होता. महाराष्ट्राच्या एका नेत्याच्या सन्मानाचा कार्यक्रम होता. सांस्कृतिक कार्यक्रम, संमेलनाला खासदार जाऊ शकतात. प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहणे योग्य नाही.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले कि, संजय राऊत शरद पवारांचे ज्या पद्धतीने गुणगान गायचे आणि आता तेच प्रश्न करताहेत तुमचे राजकारण आम्हाला कळत नाही का? जे संजय राऊत शरद पवारांचा उदोउदो करायचे तेच आता त्यांच्यावर टोकाची टीका करायला लागलेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून जितेंद्र आव्हाड उत्तरे देताहेत. हे आता जरी वरकरणी छोटे युद्ध वाटत असले तरी भविष्यात त्यांच्यात दुहीची बिजे पेरलीत, असेही दरेकर म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची खिल्ली उडविताना दरेकर म्हणाले कि, आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रावर कब्जा केलाय. आता दिल्लीवर झेंडा फडकविण्याची त्यांची इच्छा दिसतेय. त्यामुळे राहुल गांधी, केजरीवाल अशा प्रकारचे राष्ट्रीय नेतृत्व कदाचित त्यांच्या डोक्यात असेल. महाराष्ट्रातील पक्षाचे काम संपले असेल. महाराष्ट्र त्यांनी पादाक्रांत करून जिंकलेला असेल म्हणून आता राष्ट्रव्यापी नेतृत्व त्यांचे तयार होत असेल त्यातून केजरीवाल, राहुल गांधी यांच्या भेटीगाठी सुरू असतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *