सोमनाथ सुर्यवंशींची हत्या करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करा.
सोमनाथ सुर्यवंशींची हत्या करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करा.
नवी दिल्ली, दि. १० फेब्रुवारी ;
परभणी व बीड प्रकरणी पोलिसांच्या मदतीने लोकांचे जीव घेतले गेले. परभणीतील आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांच्या मारहणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सरकारने अजून त्या पोलिसांवर कठोर कारवाई केलेली नाही. संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीत कोंबिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. या कोंबिंग ऑपरेशनचे आदेश कोणी दिले? मंत्रालय व पोलीस महासंचालक कार्यालयातून आदेश दिले गेले का? याची चौकशी करून कोंबिंग ॲापरेशन करणारे अधिकारी व त्यांना आदेश देणा-यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी या निरपराध सुशिक्षित तरुणाचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळेच झाल्याची पुष्टी शवविच्छेदन अहवालानेही केली असताना राज्य सरकार अद्याप संबंधित पोलिसांना पाठीशी घालत आले आहे. सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाला अशी खोटी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात देऊन सभागृहाची दिशाभूल केली. आता सरकार याच प्रकरणी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करत आहे. सुर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार नाहीत तर मग सरकार त्यांना निलंबित का करत आहे असा प्रश्न विचारून फक्त निलंबित करून चालणार नाही तर त्यांना बडतर्फ केले पाहिजे. विधानसभेत खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस हक्कभंग आणणार आहे, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या या अत्यंत गंभीर घटना आहेत. दोन्ही प्रकरणात सरकार चालढकल करत आहे. बीड प्रकरणात भाजपाचे आमदार सुरेश धस दररोज नवीन सनसनाटी आरोप करत आहेत. पण सरकार काहीच कारवाई करत नाही. यावरून हे सर्व ठरवून सुरु आहे असे दिसते. आता त्यांनी परभणी प्रकरणात पोलिसांना माफ करण्याची भाषा केली आहे. हा दुटप्पीपणा असून तो फक्त सुरेश धस यांचा नसून सरकारचा दुटप्पीपणा आहे. सरकार सुरेश धसांना बुजगावण्यासारखे उभे करून मुळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
