मुंबईत कोसळ’धार’; जनजीवन विस्कळीत.
मुंबईत रस्ते जलमय, लोकलसेवा ठप्प..
मुंबई, दि. 23 सप्टेंबर :
मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून पावसाने धुमाकूळ घातला असून या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार भेंडीबाजार, गोल देऊळ, नाना चौक, मुंबई सेंट्रल जंक्शन, बावला कंपाऊंड, जे जे जंक्शन, हिंदमाता, काळाचौकी, सारथी बार, वरळी सी फेस येथे पाणी साचले आहे. सर्व विभाग पाण्याचा निचरा करण्याकरिता कार्यरत आहेत. बेस्ट बसच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून काही मार्ग बदलण्यात आले आहेत.
पाणी साचल्याने लोकल रेल्वेसेवरही त्याचा परिणाम झाला आहे. चर्चगेट ते अंधेरी दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने या स्थानकांदरम्यानची रेल्वे सेवा ठप्प झाली आहे तर अंधेरी ते विरार दरम्यान लोकल सेवा सुरू आहे.
सायन-कुर्ला, चुनाभट्टी-कुर्ला आणि मस्जिद बंदर स्थानकातील रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सीएसएमटी-ठाणे, सीएसएमटी-वाशी दरम्यानची सेवा रद्द करण्यात आली आहे. तर ठाणे-कल्याण आणि त्यापुढील तसंच वाशी-पनवेल शटल सेवा सुरु आहे. केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा सुरू आहेत.
लांब पल्ल्याच्या विशेष गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. मनमाड-मुंबई विशेष आणि मुंबई-मनमाड विशेष ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर एलटीटी-गुवाहाटी विशेष ट्रेन दुपारी 1 वाजता, सीएसएमटी-केएसआर बंगळुरु विशेष ट्रेन दुपारी 12.30 वाजता आणि सीएसएमटी-लखनौ विशेष ट्रेन दुपारी 12.40 वाजता सुटणार आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता खासगी कार्यालये आणि आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.गरज असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावे अन्यथा घरीच रहावे असेही महापालिकेने म्हटले आहे. आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
