fARMER kANGANA

कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर
अभिनेत्री कंगणाची बडबड काही थांबत नाही. आता या नटीने कृषी विधेयकांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट दहशतवादीच म्हटले आहे. या बडबडीनंतर तिच्यावर चौफर टीकेची झोड उठली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खा. राजू शेट्टी यांनीही कंगनाचा समाचार घेतला,
शेट्टी म्हणाले, ‘जिथे शेतीच केली जात नाही अशा डोंगरावर जन्मलेल्या आणि शेतीशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या कंगनासारख्या नटवीने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणे यासारखा दुसरा विनोद नाही’, शेतकऱ्यांवर टीका करणारे नट आणि नट्यांना शेतकऱ्यांची मुले सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.

मोदी सरकारने ज्या पद्धतीने शेती विधेयके मंजूर केली त्यावरही शेट्टी यांनी तीव्र संताप व्यक्त केला.विरोधी पक्षांचा कडाडून विरोध असतानाही बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर करून घेतली. सरकारच्या या निर्णयानंतर शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला आहे.
केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आली आहे. त्याविरोधात शेतकरी आक्रोश करत असताना कंगनासारख्या एका नटवीने शेतकऱ्याला दहशतवादी म्हणणे हे दुर्दैवी आहे. कंगना जे काही बोलत आहे त्यामागे मागे जे कुणी शिखंडी असतील त्यांनी शेतकऱ्यांची सहनशीलता जोखू नये. आज तुम्ही सत्तेत असलात, तुमच्याकडे पाशवी बहुमत असलं व तुम्ही काचेच्या महालात वावरत असलात तरी ते कायम राहणार नाही. शेतकऱ्यावर अन्याय कराल तर शेतकऱ्याची मुले स्वस्थ बसणार नाहीत. त्यांच्या हातात दगड दिसतील आणि तुमचे काचेचे इमले उद्ध्वस्त होतील इतके लक्षात ठेवा, असा इशाराच शेट्टी यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *