बॉलिवूड स्टार सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला.
बॉलिवूड स्टार सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला.
मुंबई, दि. १६ जानेवारी :
अभिनेता सैफ अली खानवर वांद्र्यातील त्यांच्या घरातच रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने अख्खे बॉलिवूड हादरले आहे. हल्ल्यानंतर सैफ अली खानला मध्यरात्रीच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रीयेनंतर सैफ अली खानची प्रकृती आता स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.
“सैफ अली खानवर न्युरोसर्जरी आणि प्लास्टिकसर्जरी करण्यात आली असून ऑपरेशन थिएटरमधून आयसीयू मध्ये हलवण्यात आले आहे. या हल्ल्यात सैफवर ६ जखमा झाल्या आहेत, त्यातील २ जखमा खोल आहेत, दोन किरकोळ जखमा आहेत. अडीच इंचाचे चाकूचे टोक सैफच्या मणक्यातून काढण्यात आले आहे.डाव्या बाजूला आणि मानेवरील खोल जखमांवर प्लास्टिक सर्जरी टीमकडून उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.
आमदार बाबा सिद्दीकी यांची वांद्र्यातच गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तसेच सुपरस्टार सलमान खान याच्या गॅलक्सी या घरावर गोळीबार करण्यात आल्याच्या घटना ताज्या असताना आता सैफ अली खानवर हल्ला झाल्याने मुंबईतील कायदा व सुवव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वांद्र्यातील हायप्रोफाईल भागात घरात घूसून हल्ला झाल्याने सुरक्षेवरही चिंता व्यक्त केली जात आहे. इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा जवान असतानाही हल्लेखोर ११ माळ्यावरील घरात शिरलाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हल्लेखोर शेजारच्या इमारतीतून आल्याची माहिती मिळाली असून मुंबई पोलीस या हल्ल्याचा तपास करत आहेत.
