..मग ‘लवासा’पासून अनेक प्रकरणांवर बोलावे लागेल!

0
ashish-pawar

..मग ‘लवासा’पासून अनेक प्रकरणांवर बोलावे लागेल!

मुंबई, दि. १५ जानेवारी.

विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक असलेल्या शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना आपला तोल गमावला आहे. विश्वासघात आणि खंजीर खुपसण्याचे राजकारण आजवर केल्यामुळेच महाराष्ट्राच्या मतदारांनी शरद पवार यांनी हद्दपार केले आहे, असा घणाघाती हल्ला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी चढवला.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. आशिष शेलार म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना न्यायालयीन प्रक्रीयेद्वारे निर्दोषत्व मिळाले आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून अमित शाह यांच्यावर तुम्ही टीका करणार असाल तर ‘लवासा’पासून अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने कोणाकडे बोट दाखवले आहे हे बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना पवारांचा राजकीय न्यूनगंड दिसून आला आहे त्यामुळेच ते शाह यांच्यावर अशा भाषेत टीका करत आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘पुलोद’च्या निर्मितीबाबत बोलताना आपण जनसंघाच्या बळावर मुख्यमंत्री झालो हे मान्य केले. मात्र हे सरकार बनवण्याआधी विश्वासघाताचे आणि खंजीर खुपसण्याचे कोणते विचारमंथन केले होते, कोणाच्या विरोधात केले होते हे सत्य महाराष्ट्राच्या जनतेपुढे येऊ द्या. पवारांनी विश्वासघाताच्या राजकारणाचे प्रशिक्षण उद्धव ठाकरे यांना दिले आहे, हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर  दिसून आले आहे. या विश्वासघाताच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेने यावेळी मतपेटीतून उत्तर दिले आहे. सत्तेच्या लोभासाठी एकत्र आलेली ही महाविकास आघाडी एक्सपायरी डेट संपल्याने केव्हाही फुटण्याची शक्यता आहे असेही शेलार यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *