अनेक गृहमंत्री झाले पण कुणालाही तडीपार केले नव्हते!
अनेक गृहमंत्री झाले पण कुणालाही तडीपार केले नव्हते!
मुंबई, दि. १५ जानेवारी:
देशाच्या गृहमंत्रीपदी सरदार वल्लभभाई पटेल होते तसेच एके काळी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केले. एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य होते. गुजरातने उत्तम प्रशासकांची ओळख देशाला करून दिली. गृहमंत्रीपदावर ज्या व्यक्ती होत्या त्यातील कोणालाही कधी त्यांच्या राज्यातून तडीपार केले गेले नव्हते, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर केला.
अणित शाह यांचे नाव न घेता शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर सर्व राज्यांना एकत्रित करण्याचे काम गृहमंत्री सरदार पटेल यांनी केले. उत्तर प्रदेशातील पंडित गोविंद वल्लभ पंत यांना देशाचे गृहमंत्री म्हणून सर्वांनी अनुभवले. यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या पदाची गरीमा आणि प्रतिष्ठा या देशभक्तांनी ठेवली. आपले शेजारचे गुजरात व महाराष्ट्र हे एक राज्य होते. गुजरातनेही अत्यंत उत्तम प्रकारची ओळख देशाला करून दिली. बाबूभाई म्हणून गुजरातचे कर्तबगार प्रामाणिक आणि स्वच्छ मुख्यमंत्री होते. त्यानंतर माधवराव सोलंकी आणि चिमणभाई पटेल आदी उत्तम प्रशासक होते. ही नावे सांगितली यांचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आले नाही असा हल्लाबोल पवार यांनी अमित शाह यांच्यावर केला.
देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषण केले. भाषण करणे हा त्यांचा अधिकार आहे पण थोडीफार माहिती घेऊन भाषण केले तर लोकांच्या मनात शंकेची स्थिती निर्माण होत नाही.१९७८ सालापासून त्यांना माझी माहिती झाली. १९५८ सालापासून मी राजकारणात काय केले त्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांना माहीत नसेल ७८ साली हे व्यक्ती कुठे होते राजकारणात मला माहीत नाही. पण ७८ साली मी मुख्यमंत्री होतो. त्यात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, प्रमिलाताई आदी कर्तृत्वान लोक, जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळात होते. पुलोद सरकारची माहिती घेतली तर यातील सगळ्यांनी राज्यासाठी चांगले योगदान दिले म्हणून मी मुख्यमंत्री असताना उत्तमराव पाटील गृहमंत्री उपमुख्यमंत्री होते. आणि आडवाणी नगरविकास खात्याचे मंत्री होते. जनसंघाची पार्श्वभूमी असलेल्यांनी माझ्यासोबत काम केले. संघात राहून आम्हाला सहकार्य केले त्यापैकी वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन होते. ही सर्व नेतृत्वाची फळी भाजपने ७८ नंतर दिली. नंतरच्या काळात देशात पक्ष वेगवेगळ्या राज्यात सत्तेत होते. पण राजकीय पक्षातील नेत्यात सुसंवाद होता. उदाहरणच द्यायचं तर वाजपेयी आणि आडवाणी यांचे नाव घेतले पाहिजे. हे कर्तृत्ववान लोक होते. त्यांनी अतिरेकी भूमिका घेऊन समाजकारण किंवा राजकारण केले नाही, असेही शरद पवारांनी सांगितले.
गुजरातच्या भूजला भूकंप झाला, मुख्यमंत्र्यांची बैठक पंतप्रधानांनी बोलावली त्यात एक प्रश्न निर्माण झाला, ही संकटे येत आहेत, अतिवृष्टी आणि महापूर, भूकंपाचे धोरण ठरवले पाहिजे. त्यासाठी वाजपेयी यांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी विरोधी पक्षात असताना मंत्र्याचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुपूर्द केलं. ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्याकडे आहे. पण हल्लीच्या गृहमंत्र्यांनी जे भाषण केले. उद्धव ठाकरे व माझ्यावर जे भाष्य केले त्यावर न बोलले बरे. मराठीत एक म्हण आहे, कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
भाजपाने उद्धव ठाकरेंबाबत जी भूमिका घेतली ती लोकांनी पाहिली. उद्धव ठाकरे सुद्धा त्यावर कधी तरी त्यांचे मत सांगतील. अमित शाह हे जेव्हा गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, अन् त्यांना मुंबईत आसरा देण्यात आला तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली होती.याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील. पण दुर्देवाने पातळी घसरली किती हे सांगायला ही पुरेशी विधाने आहेत. अशा व्यक्तीने जी विधाने केली त्याची नोंद पक्षात किती घेतली हे न सांगितलेले बरे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
